आपण का निवडणूक लढायची ?
समस्त पुणतांबा ग्रामस्थ ,
नमस्कार ,
मित्रानो , एक क्रांतिकारी गाव म्हणून आपली ओळख आहे. अशा आपल्या पुणतांबा गावची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपले सरपंच पद हे महिला राखीव आहे. सरपंचासह सतरा सदस्यांची आपली ग्रामपंचायत आहे. यात सामाजिक वर्ग निहाय आरक्षण आहे. महिला राखीव आरक्षण आहे. पुरुषांना तशी संधी कमी आहे. पण नेहमीच्या सवयी नुसार एक रबर स्टॅम्प निवडून देण्याची सक्ती हि घटना बाह्य आहे. पण आपण ती लोकशाहीच्या नावावर स्वीकारीत आहोत. या चुकांवर आपण चर्चाही करत नाही.
असो ,सर्व मतदारांना गृहीत धरून सरकार ,सरकार चालविणारे अधिकारी , विश्वस्त (आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी ) हे सर्व निर्णय घेतात. यातून आम्ही गुलाम झालो आहोत. या चुकीच्या परंपरेत सुधारणा करणे यासाठी आमच्याकडे शक्तीच राहिली नाही. हि शक्ती संपविण्याचे षडयंत्र या व्यवस्थेने केले आहे. यावर माझ्याकडे दोन उपाय होते. पहिला गावच्या गरजापूर्ण झाल्याशिवाय निवडणूक नको. प्रशासकाच्या हातून त्या सर्व पूर्ण करून घेणे. या उपायासाठी धाडसाची , समाज्याच्या भल्याची इच्छाशक्ती ,मानसिकता असावी. दुर्दैवाने आमचे राजकारणी तसे नाही. त्यामुळे निवडणूक होणारच आहे.त्या घेण्यासाठी राजकारणी व प्रशासन उत्सुक आहेत.
मग माझा दुसरा उपाय म्हणजे निवडणुकीत सर्वस्तरातून आपण सर्वानी सहभाग नोंदविणे. मी तर ठरवलं आहे. माझे चार मित्र घेऊन निवडणूक रिंगणात उतरायचं. माझा हा प्रस्थाव माझ्या काही ग्रामस्थ मित्रांना पुढे ठेवला. सुरुवातीला त्यांची सर्वांची एकच प्रतिक्रिया होती. राजकारण ,निवडणूक आपला विषय नाही.त्यांना मी दुसरा प्रश्न केला , निवडणूक आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. एकूणच सामाजिक मानसिकतेचा विचार केला तर एक लक्ष्यात येते कि समाजाला भयभीत करून आमचे राजकारणी आम्हाला गुलामीकडे घेऊन चालले आहे. त्यांची भीती नागरिकांना वाटते. पण हि बाब लोकशाहीसाठी घातक आहे.
तुम्हाला खुलासेवार सांगतो. तुम्ही विचार करा. मला खात्री आहे. तुम्हीहि माझ्यासोबत हि निवडणूक लढणार आहात. कारण हा आमचाच विषय आहे. आमचा अधिकार आहे. आम्ही निर्भय आहोत. कुणाला घाबरत नाही. भारताच्या घटनेवर आमचा विश्वास आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार आम्ही बनवतो. आमच्यासाठी आम्हाला त्यांनी गृहीत धरण्यासाठी नाही. हे सिद्ध करून देऊ. हि भ्रष्ट किडलेली व्यवस्था बदलून टाकू. त्याची सुरुवात आपल्या गावापासून करू.
आपण का निवडणूक लढायची ?
- ज्यांना कुणाला असे वाटते कि , मी गावाचा कर्ताधर्ता आहे. तो आमच्यासाठी आम्ही तिथे बसवलेला आहे.याची त्याला जाणीव करून देण्यासाठी आपण निवडणूक लढायची आहे..
- जे आमदार खासदार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. आम्ही पैसे घेतले असे आरोप करतात. आपल्याला विकत घेण्यासाठी गावात ठरविक लोकाना नेमतात. व आपल्याला त्यांच्या दारात जायला भाग पडतात.हे सर्व का होत तर आपण स्वतः निवडणुकीपासून दूर राहातो. म्हणून हे लोक आपल्याला गृहीत धरून आपले राजकारण करतात. व आपण त्यांचे गुलाम होतो.
- आपल्या गावची कोणतीही अडचण ताबडतोब सोडवून घेण्यासाठी आपल्यात शक्ती यावी म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे.
- ज्यांची नावे मतपत्रिकेत येतात त्यांचं सरकार दरबारी वजन असत. मतदार यादीत नाव आल्याने फक्त विकत घेता येईल असा मतदार आपण होतो. हे होऊ नये म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे.
- आजवर आपल्यावर पैसे घेतल्याचा आरोप या राजकारण्यांनी केला आहे.तेच राजकारणी तुम्ही निवडणूक लढले तर तुम्हाला गृहीत ना धरता हिशोबात धरतील. म्हणून आपण निवडणूक लढली पाहिजे.
- ग्रामसभेत आपल्याला तु खाली बस , तुला काय म्हणायचं लक्ष्यात आलं. असं लोक का म्हणतात कारण आपण निवडणूक लढत नाही.तेव्हा निवडणूक लढा.
- आपल्याला ग्रामसभेत सरकारी अधिकारी यांचेकडून उत्तर पाहिजे असत. पण त्याला ते न देवू देता आपले नेतेच त्याची वकिली करतात म्हणून आपल्याला निवडणूक लढली पाहिजे.
- निवडणूक हि कुण्या राजकारण्यांच्या राजकीय पक्षाच्या मालकीची आहे. असा गैरसमज या लोकांचा झाला आहे.तो दूर करण्यासाठी निवडणूक लढा.
- निवडणूक हा पैशाचा खेळ आहे. पैसे लागतो हे खोटे सांगून गरीब नेते स्वतः श्रीमंत झालेत. त्या नेत्यांना निवडणूक बिना पैशाची लढता येते .हे दाखवून देण्यासाठी निवडणूक लढा.
- आपल्याला निवडणूक अगदी लकी ड्रॉ सारखी असली पाहिजे असे वाटत असले तर निवडणूक लढा. कारण खूप ज्यास्त उमेदवार असतील तरच हे शक्य आहे.
- ज्यांनी पैसे वाटले त्यांना पडायचं असेल तर निवडणूक लढा.
- तुम्हाला निवडणुकीच्या मशीन मध्ये सेटिंग करता येते यातलं खरं खोट शोधण्यासाठी निवडणूक लढा. एकाच वेळेला आपण दोन तीनशे लोक एका वार्डात निवडणूक लढलो तर निवडणूक मशीनवरून मतपत्रिकेवर घ्यावी लागेल. मग शंकेचं कुठलं कारण राहणार नाही.
- आपण निवडणूक लढलो तर निवडून येणार उमेदवार हा एखाद्या दुसऱ्या मताने निवडून येईल. मग तो आपल्यावर दादागिरी करू शकणार नाही. शिस्तीत आपल्या वार्डातल्या कामावर लक्ष देईल. यासाठी तुम्हाला निवडणूक लढावी लागेल.
या सर्वांचा विचार करा , मी निवडणूक लढणार आहे.तुमचं देशावर प्रेम आहे. तुम्हाला हि घाणेरडी सिस्टीम नको आहे. तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा आहे. तर आपल्या वार्डापासून ,गावापासून सुरुवात करा. आपण हिव्यवस्था नीट नेटकी करू. आपलं ,गावच ,देशाचं नाव मोठं करू.
भारत माता कि जय .
@माधव ओझा . पत्रकार पुणतांबा .