कमी पाण्यात येणारे व दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तग धरणारे पिकांचे वाण विकसित होणे गरजेचे ”
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन झाले आहे, मात्र त्यातही सातत्य नाही. कुठे कमी तर कुठे पुरेशा प्रमाणात तो बरसत आहे. यापूर्वी मात्र पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली ज्याच्या परिणामस्वरूप खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली, पिकांची पुरेशी कायीक वाढ झाली नाही, आता पिकांचा कल घाईघाईने पुनरउत्पादन अवस्थेकडे जाण्याचा असेल. परिणामी पिकांचा एकूण कालावधी नियोजित कालावधी पेक्षा पुष्कळ कमी झाल्यामुळे पिकांच्या उत्पादकतेत कमालीची घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती वारंवार निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि अशा परिस्थितीस तोंड देण्याची तयारी सर्वांनीच विशेषतः कृषी क्षेत्रात कार्यरत शास्त्रज्ञांनी ठेवली पाहिजे. कमी पाण्यात येणारे तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तग धरणारे वाण विकसित करण्याचे आव्हान शास्त्रज्ञापुढे आहे. पीक लागवडीनंतर 2/3 महिने पिकाच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय हायड्रोजेलचा वापर फायदेशीर ठरतो असा दावा व त्याबाबतचे पेटंट फाईल केल्याविषयी चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगा येथील प्रकाश पवार यांनी नुकतेच समाजमाध्यमांवर सांगितले आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांची मदत घेऊन व जलसंवर्धन विज्ञानाच्या संशोधनाच्या निकषानुसार या हायड्रोजेलच्या चाचण्या घेऊन निश्चित अशा निकषापर्यंत श्री. पवार यांचे प्रयत्न पोहोचले तर कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरेल. यापुढे पावसाची सध्याची परिस्थिती शेतकरी, शास्त्रज्ञांबरोबरच इतर सर्वांनीच गांभीर्याने घेतली पाहिजे एवढं मात्र खरं.
मागच्या आठवड्यात लिहिल्याप्रमाणे रब्बी हंगामात ,सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात पेरावयाच्या पिकात रब्बी ज्वारी व करडई पिकांचा समावेश होतो. पावसाच्या कमतरतेमुळे अकाली पक्व झालेल्या पिकांची काढणीही अर्थातच नियमित वेळी आधीच करावी लागणार आहे. अशा क्षेत्रात खरीप पिकाची काढणी व रब्बी पिकांच्या पेरणी दरम्यान पाऊस पडला तर रब्बी पिकासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. परंतु यदाकदाचित यादरम्यान पावसाने उसंत दिली तर रब्बी पीक पेरणी अगोदर आवश्यक ती मशागत करून रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करणे सहज शक्य आहे.
खरीपातली पिके ही संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात त्यामुळे पीक व्यवस्थापनाच्या संधीही कमी असतात परंतु रब्बी पिकाचे तसे नसते. ही पिके एक तर खरिपात पडलेल्या पावसाच्या पाण्याच्या ओलीवर घेतली जातात किंवा संपूर्णतः बागायती म्हणून घेतली जातात. यामुळे या पिकांसाठी पीक व्यवस्थापन करणे सहज शक्य होते. पीक व्यवस्थापनात पेरणीपूर्व व आंतर मशागत, बीज प्रक्रिया ,खत व पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबींचा समावेश होतो. पीक व्यवस्थापनातील या गोष्टी वेळच्यावेळी व योग्य प्रमाणात केल्या तर उत्पादनाची निश्चित अशी शाश्वती असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .
Dear reader , subscriber
I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.