“उन्हाळी हंगामात प्राधान्याने करा चारा पिकाची लागवड”
या वर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे येत्या उन्हाळी हंगामात ज्या शेतकरी बांधवांकडे पशुधन आहे त्यांना सर्वच प्रकारच्या जनावरांना खाद्य म्हणून
चा-याची टंचाई निर्माण होवू शकते. पशुधनाला विषेशतः दुभत्या जनावरांना कोरड्या चा-याबरोबर किंवा इतर पशुखाद्याबरोबर हिरवा चारा दिला गेला तर निश्चितच दुध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे उन्हाळी हंगामात काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्यांनी प्राधान्याने ज्वारी, बाजरी किंवा मका यासारख्या हंगामी तृणधान्ये चारा पिकाची लागवड करावी जेणेकरुन उन्हाळी हंगामातही दुभत्या जनावरांनाही हिरवा चारा उपलब्ध होईल. काही शेतकरी उन्हाळी हंगामात बाजरी पिकाची धान्यासाठी लागवड करतात परंतु उन्हाळयात इतर कुठलीही धान्याची पिके शेतात उभी नसल्याने कुठेतरी एखादे-दुसरे ठिकाणी लागवड केलेल्या बाजरीच्या पिकास जेंव्हा
कणसे येतात तेंव्हा पक्षी त्याच्यावर तुटून पडतात आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठ उन्हाळी हंगामात बाजरी धान्यासाठी लागवड करण्याची शिफारस करत नाही.
उन्हाळी हंगामात चारा पीक म्हणून लागवड करण्यासाठी ज्वारीचे रुचिरा, फुले अमृता, फुले गोंधन व मालदांडी ३५-१ या सुधारित वाणांची तर बाजरीचे जायंट बाजरा व बायफ बाजरा आणि मक्याचे अफ़्रीकन टॅाल, मांजरी कंपोझिट, विजय व गंगा सफेद-२ या वाणांची उन्हाळी लागवडीसाठी शिफारस आहे.
ज्वारी व मका या पिकाची चा-यासाठी कापणी पीक ५० टक्के फुले-यात असताना म्हणजे लागवडीनंतर ६५ ते ७० दिवसांनी आणि बाजरीची कापणी लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी करावी. साधारणपणे या तृणधान्ये चारा पिकांपासून एकरी २०० क्विंटल हिरव्या चा-याचे उत्पादन मिळते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .