“उन्हाळी भुईमुगाची करा योग्य वेळी लागवड”
खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जास्त मिळते परंतु
हे उत्पादन मिळविण्यासाठी उन्हाळी भुईमुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात करणे गरजेचे असते. उशिरा पेरणी केल्याने भुईमुगाच्या काढणीच्या वेळी पीक पावसात सापडले तर काढणीस उशीर होतो तसेच पावसाळी काळात भुईमुगाच्या दाण्यांना जमिनीतच कोंब फुटून मोठे नुकसान होते.
भुईमुगाच्या उन्हाळी लागवडीसाठी एसबी ११, टीएजी-२४, टीजी-२६, टीपीजी-४१, जेएल-५०१, जेएल-७७६, फुले उन्नती, फुले चैतन्य व फुले भारती या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. जातीनुसार व बियाणाच्या आकारानुसार प्रति हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड केल्यास सुमारे २५ ते ३० टक्के बियाणे कमी लागते.
बियाणे प्रमाणित नसल्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २.५ ग्रॅम मॅंकोझेब किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम रायझोबीयम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.
भुईमूग लागवडीपूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे. प्रती हेक्टरी डीएपी १०० किलो किंवा १०० किलो २०:२०: ०० + १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ४० किलो युरिया + २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत जमिनीत पेरून द्यावे. जमिनीत जस्त , लोह व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता निदर्शनास आलेली असेल तर जस्ताच्या कमतरतेसाठी १० किलो झिंक सल्फेट व बोरॅानच्या कमतरतेसाठी ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रेसोबत जिप्सम ४००किलो (२०० किलो/हेक्टरी पेरणीच्या वेळी व उर्वरित २०० किलो/हेक्टरी आ-या सुटताना) जमिनीत मिसळून द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .