खरीप हंगामाची पूर्वतयारी
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये मातीपरीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाणांची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करुन ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी औजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी मातीपरीक्षण उपयोगी ठरते. मातीपरीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्चित करता येते.
जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती लोड किंवा मैंदाच्या सहाय्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळया दयाव्यात, शेवटच्या कुळवणी अगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांध बंदिस्ती करुन पुर्वीच्या पिकांची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.
पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणा-या सुधारीत वाणांचा महत्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाणांची निवड करताना जास्त उत्पादन देणा-या, खतास चांगला प्रतिसाद देणा-या, कमी कालावधीत व कमी पाण्यात
येणा-या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्यांची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/जातीचे नाव, उगवणक्षमता, इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करुन त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाणाच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाणात काही दोष आढळल्यास बील, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.
पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करुन ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात व मका या एकदल व तृणधान्य पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर, शेंगावर्गीय द्विदल पिकांसाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .