“पडणाऱ्या पावसानुसार खरीप पिकांचे नियोजन”
पावसाचा वर्षानुवर्षाचा लहरीपणा लक्षात घेता सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात पाऊस कधीच पडत नाही. काही ठिकाणी पावसाला वेळेवर सुरुवात होते तर काही ठिकाणी जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाला सुरुवात होत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. कधी कधी तर अगदी जुलै अर्धा उलटून गेला तरी काही भागात पावसाला सुरुवात होत नाही आणि जसजसा उशीर होत जातो त्यानुसार खरीप पिकांची पेरणी करावी की नाही या संभ्रमावस्थेत शेतकरी पडतो. एवढ्या महागा मोलाचे बियाणे जमिनीत कमी असलेल्या ओलीत पेरले आणि ते उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. अशा परिस्थितीत आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करणे गरजेचे ठरते.
जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर खरिपाची मूग, उडीद,कापूस ही पिके पेरणे योग्य ठरत नाही. ही पिक उशिरा पेरल्याने या पिकांची वाढ योग्य होत नाही. पर्यायाने या पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीत. भुईमुगासही ओलावा कमी पडला तर उत्पादनात लक्षनीय घट येते तेव्हा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढे भुईमुगाची लागवड करू नये. बाजरीही 15 जुलै नंतर पेरल्यास पिकावर अर्कट रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी मिळते, मात्र सलग सूर्यफूल किंवा सलग तूर याचबरोबर सूर्यफूल + तूर (२:१) आंतरपीक ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पेरता येते.
ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही आणि केवळ पावसाच्या पाण्यावरच त्याची शेती अवलंबून आहे व खरिपात पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून त्याच ओलीवर रब्बीचे पीक घेतले जात असेल अशा शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा कालावधी ही लक्षात घेतला पाहिजे. पावसाचे आगमन जास्त लांबले आणि रब्बी पिकांच्या नियोजित पेरणीच्या वेळे अगोदर उशिरा पेरलेल्या खरीप पिकाचे उत्पादन कमी तसेच रब्बी पिकांना पेरणीसाठी जसजसा उशीर होईल तशी रब्बी पिक उत्पादनाची ही शाश्वती नाही अशा परिस्थितीत दोन्ही पिके घ्यायची किंवा खरीप आणि रब्बी पैकी फक्त एकच पीक घ्यायचे याचा योग्य निर्णय घेणे गरजेचे ठरणार आहे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .