मान्सूनच्या पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच खरीप पिकांची पेरणी करा
मान्सून पूर्व पावसानंतर पूर्वमशागत आणि मान्सूनच्या पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच खरीप पिकांची पेरणी करा”
गेल्या काही वर्षात वळवाचा किंवा मान्सूनपूर्व पाऊस नेहमीप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडत नाही. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ऋतुचक्रात बदल होऊन वर्षातील तीनही हंगाम साधारणपणे पंधरा दिवस ते एक महिन्याच्या कालावधीने उशिरा सुरू होऊ लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वळवाचा पाऊसही जून महिन्यात नियमित मान्सूनच्या अगोदर काही दिवस पडायला लागला आहे. त्यामुळे मे महिन्यात करण्यात येणारी शेतीची पूर्व मशागतीची कामे शेतकरी आता जून महिन्यात पडलेल्या पहिल्या पावसानंतर हाती घेऊ लागली आहेत. यामध्ये उन्हाळी नांगरटीनंतर शेतात मातीची घट्ट झालेली ढेकळे नंतरच्या कडक उन्हात चांगली तापून निघालेली असल्याने जून महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर किमान दोन कोळपण्या किंवा वखरण्या करून जमीन भुसभुशीत करणे गरजेचे असते.
यावर्षीही जून मध्यावर आला असतानाही काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला असल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून कृषी विद्यापीठातील संशोधक, कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी सातत्याने शेतकरी बांधवांना सांगत आलेत की “कमीत कमी १०० मि.मी.पाऊस पडल्याशिवाय खरीप पिकांची पेरणी करू नका”, काही शेतकऱ्यांनी तरीही अल्प पावसावर पिकांची पेरणी केली आणि आता त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जमिनीत पुरेसा ओलावा नसता बियाणे पेरले तर ते पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही. धूळपेरणीनंतर किंवा अत्यल्प पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसला, बियाणे पेरल्यानंतर विशिष्ट काळात जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही तर पेरलेले बियाणे पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही, पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. पिकाला खत दिले असेल तर त्या खतावरील व महागड्या बियाणावर केलेला खर्च वाया जातो. तेव्हा किमान १०० मि.मी. पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांनी खरीप पिकांची पेरणी करू नये.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .