श्री रामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात
credit : (News & Photo – SSST, SHIRDI)
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्री साईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरतीनंतर श्री साईबाबांच्या फोटोची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्दारकामाई पर्यंत काढण्यात आली. संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेवुन सहभागी झाले होते. याप्रसंगी संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, सौ.मिनाक्षी सालीमठ, सौ.कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाईत गेल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी व्दितीय अध्याय, मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी चौथा अध्याय व सामान्य प्रशासन प्र.अधिक्षक राजतिलक बागवे यांनी पाचवा अध्यायाचे वाचन केले.
