सहकारी साखर कारखान्यांनी सभासदांना बोनस शेअर व मासिक सन्मान निधी द्यावा – नितीन शिंदे यांची मागणी
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने परिसराचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, त्यासोबतच राज्यात पहिल्यांदा सभासदांना आपल्या अधिकाराची जाणीव झाल्याचे दिसून आले आहे. आजी माजी मंत्री समोरासमोर आल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली. आता संपूर्ण परिसराला या निकालाची उत्सुकता लागली आहे.
यंदाच्या या निवडणुकीने सहकारातील निवडणुकीचे आयाम बदलले असल्याचे चित्र दिसून आले. व या संस्था किती प्रशस्त व सुबत्ता असलेल्या आहे . याची जाणीव सभासदांना झाली आहे.
या निवडणुकीतील आर्थिक उलाढाल पाहता केंद्र व राज्य सरकार प्रमाणे राज्यातील साखर कारखाने सभासदांना कारखान्याने सन्मान निधी व त्यांचे शेअरच्या बदल्यात बोनस शेअर द्यावी हा कायदा बनवावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी टी टाइम न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे .
वास्तविक पाहता सर्व सहकारी कारखान्यानी आपल्या सभासद करण्याच्या व ऊस पुरवण्याच्या प्रक्रियेत शेअर्स दिलेले आहे. कारखान्याचे साखर निर्मिती शिवाय मोलॅसिस, अस्कोर्बीक ऍसिड ,दारू , बगॅस अशी अनेक उत्पन आहे. यातून कारखान्यांना चांगला नफा मिळतो . मात्र हे सत्य सभासदांसमोर येत नाही. किंवा यावर कुठल्याच वार्षिक सभेत खुल्या मनाने चर्चा होत नाही. त्यामुळे या सर्व कारखान्यांनाही सभासदांचे उतराई होण्याच्या दृष्टीने त्यांना दिलेले शेअर मध्ये पंचवार्षिक तितकेच बोनस शेअर द्यावे. त्यासोबतच प्रत्येक सभासदाला किमान एक हजार रुपये दरमहा सन्मान निधी देण्यास हरकत नाही . या बाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिल आहे .