रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेच व्यापारीकरण त्याचे दुष्परिणाम
ऐतिहासिक शेतकरी संपची हाक देणारे ” पुणतांबा जंक्शन ” या गावावर आज येथे पॅसेंजर सुरू करा व इथून जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यासह वंदे भारतला थांबा द्या ही मागणी घेवून स्वातंत्र्य दिनाचे दिवशी ” रेल रोको ” करण्याची वेळ आली आहे. अर्थात या रेल रोको मध्ये आता परिसरातील दहा गावे सहभागी होण्याच्या तयारीत आहे.यासाठी नवनिर्वाचित पण अनुभव असलेले शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या रेल रोकोची सूचना थेट संसदेत दिली आहे. त्यांच्या या कृतीने केंद्र सरकारात सामान्य जनतेविषयी असलेल्या संवेदनशिलेतेचे दर्शन घडणार आहे. त्यासोबतच हा रेलरोको म्हणजे गेल्या दशकात रेल्वेच्या मनमानी आणि दीखाव्याच्या विकासाचे वाभाडे काढणार आहे.
भारतीय इंग्रज ( हल्लीच रेल्वे प्रशासन ) आणि व्यापाराच्या निमित्ताने देशावर राज्य करणारे इंग्रज या दोघांच्या कार्यपद्धतीचे देशवासीयांच्या जीवनावर जे बरे वाईट परिणाम झाले. पारतंत्र्याची अनुभूति स्वतंत्र भारतात जन्मलेल्या देशवासियांना देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. याची प्रचिती पुनतांब्यासह हजारो गावांना येत आहे. पारतंत्र्याचा अनुभव आमची सरकारी व्यवस्था करून देत आहे. खासकरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले रेल्वे प्रशासन.
देशात महामारी आली. आणि आमच्या सरकारची लॉटरी लागली. या संपूर्ण महामारीत देशवासीयांना टाळेबंदी लावून आर्थिक,शारीरिक, मानसिक गुलाम करून शक्ति हीन करून ठेवले आहे. रेल्वे सारख्या स्वस्त आणि सुरक्षित अशा वर्षानुवर्ष सुरू असलेले दळणवळणाचे संसाधनावर भारतीय इंग्रजांची वक्र दृष्टी पडली आणि सामन्यांचा प्रवासी गाड्या म्हणजेच पॅसेंजर बंद करून सरकार नोटा कमवायला सुरूवात केली .अशावेळी इंग्रज बरे होते अस म्हणण्याची वेळ आली.
भारताला दक्षिण उत्तर जोडणारा रेल्वे मार्ग जो इंग्रजांनी बनवला होता. यावरील फक्त दौंड मनमाड हा रेल्वे मार्ग सुमारे वीस छोटे मोठे गावातून जातो. यालाच जोडून असलेले सुमारे शंभर दीडशे गावच्या ग्रामस्थांचे दळणवळणाचे साधन फक्त रेल्वे ही होती व आहे. रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित व स्वस्त आहे. म्हणून देशवासीयांची पहिली निवड ही रेल्वे आहे. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी या मार्गावरील संवत्सर , निपाणी वडगाव सारख्या छोट्या रेल्वे स्थानकावर पहिल्या दिवसापासून रेल्वेला थांबे दिलेले होते. त्यांनी या वेळी नफ्या तोट्याचा नाही तर नागरिकांच्या सोय सुविधेचा विचार केला. ही इंग्रजातील संवेदनशीलता होती. याच्या अगदी उलट परिस्थिति आज आमच्या स्वतंत्र भारतातील सरकारची आहे. या व्यापारी सरकारला नागरी सोय सुविधांच्या साधनातून पैसा कमवायचा आहे. हे देशवासीयांचे दुर्दैव आहे. म्हणून मी यांना भारतीय इंग्रज म्हणत आहे.
रेल्वे विभागा हा केंद्राचे अधिकारात आहे. त्यामुळे एक दोन नव्हे तर अनेक ग्रामस्थांनी अनेकवेळा आमच्या स्टेशनवरील अडचणी बरोबरच बंद केलेल्या पॅसेंजर व एक्सप्रेस थांब्यासाठी आपपल्या स्तरावर प्रयत्न केले. ममता बॅनर्जी पासून ते आश्विन वैष्णव पर्यन्त सर्व रेल्वे मंत्र्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. महामारी नंतर रेल्वेने पॅसेंजर गाड्या बंद केल्या. त्यासोबत लहान स्टेशन वरील रेल्वे थांबे बंद केले. अनेक रेल्वे स्टेशनच बंद केले. हा कसला विकास ? गांव उजाड करून सरकार नागरी सेवेतून पैसा कमवायला निघाल्यावर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. पुणतांबा जंक्शनवरील थांबे अचानक बंद झाले . गावकऱ्यांना वाटले दुहेरीकरांमुळे बंद केले असतील. पण तसे झाले नसल्याचे लक्षात येताच या बंद थांब्यासाठी रावसाहेब दानवे हे राज्य रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांना तीन वेगवेगळ्या शिष्ठ मंडळांनी निवेदने दिली होती. ग्रामस्थानी pmo ला देखील लिहिले . दुर्दैवाने रेल्वेने pmo ला खोटी माहिती दिली. उच्च पदस्थ अधिकारी हे मनमानी करीत आहे. जी एम , डी आर एम ही मंडळी रेल्वेचे मालक असल्यासारखी नागरिकाना वागणूक देतात. याचा अनुभव पुणतांबेकरांनी घेतला आहे. या नोकरशहा मध्ये एव्हढी मगरुरी येते कशी ? असा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे.यासोबतच एका मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाला शाल आणी साईबाबांची मूर्ती डायरी देवून सत्कार केला. ही गांधीगिरी करूनही त्या निर्लज्ज महाप्रबंधकाने सत्कार घेवून गावकऱ्यांची अडचण काय आहे हे ही विचारले नाही.
रेल्वेच्या मनमानीने या रेल्वे मार्गावरील सुमारे दोनशे गावांचे अर्थकारण ,जनजीवन विस्कळीत केले आहे. याची जाणीव लोकप्रतिनिधिना नाही. त्यांनी पुणतांबा शिर्डी रेल्वे मार्गाचे सर्व फायदे उचलत आपल्या गावात सर्व एक्सप्रेस गाड्यांचे थांबे करून घेतले. वास्तविक पाहता पुणतांबा शिर्डी हा रेल्वे मार्ग जवळच आहे . म्हणूनच हा रेल्वे मार्ग करून पुणतांबा जंक्शन केले. आज मितीला साई भक्त कोपरगाव येथे उतरला तर त्याला पन्नास रुपये देवून शिर्डीत यावे लागते. तीच अवस्था श्रीरामपूरची आहे.तर शिर्डी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या भाविकाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी 20 ,25 रुपये द्यावे लागतात. पुणतांबा येथे भाविक उतरले तर त्यांना अवघ्या 20 रुपयात साई मंदिरापर्यंत पोहचता येते. तालुक्याला जायला बस सेवा देवू शकत नाही यावरून स्थानिक लोकप्रतिनिधिनी या परिसराला वेठीस धरले आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रेल्वेची अडचण सुटणे अशक्य आहे.
याला कंटाळून शेवटी ग्रामस्थानी रेलरोकोचा निर्णय घेतला आहे. व हा रेल रोको यशस्वी करण्यासाठी परिसरातील सुमारे दहा खेड्यांनी या रेल रोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आता खऱ्या अर्थाने रेल्वे प्रशासनाच्या संवेदांशीलतेची ही सत्व परीक्षा आहे. 26 जुलै 2024 रोजी पुणतांबा ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचा ठराव , रेलरोको आंदोलनाचे निवेदन रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव सह , जी एम मध्य रेल्वे , डी आर एम पुणे , आजी माजी खासदार , जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मेल व प्रत्यक्ष व रजिस्टर पोस्टाने पाठवले आहे. त्यावर रेल्वेच्या कमर्शियल विभागाच्या विद्वान अधिकाऱ्याने या स्टेशनवरून फक्त पाच तिकिटे विकली जातात हा खोटा अहवाल दिला. तो देत असताना त्याने इथे किती गाड्या चालतात इथे तिकीट विक्री सुरू आहे का ? याचा खुलासा न करता आपल्या अककलेचे दिवाळे काढले आहे. अशा खोटरड्या कमर्शियल अधिकाऱ्याला पुणतांबेकरांनी काढलेल्या गेला सहा महिन्यात स्वतःच्या रेल्वे प्रवासासाठी काढलेल्या तिकीटांचा हार त्यांच्या पुणे डी आर एम कार्यालयात जावून घालण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या मनमानी करणारे विक्षिप्त अधिकाऱ्यानी आपल्या अधिकाराचा गैर वापरू करून विकास नव्हे तर गांव भकास केली आहे. लातूर रेल्वे स्टेशनला कॉर्ड लाइन टाकली आज तिथून लातूर शहरात जाण्यासाठी प्रती मानसी 60 ते शंभर रुपये लागतात. याशिवाय या कॉर्ड लाईनवर असलेल्या लातूर रोड वर प्रवाशाच्या सुरक्षेची कुठलीही व्यवस्था नाही. हीच अवस्था दौंड जंक्शनची आहे. आता पुणतांबा येथे ही कॉर्ड लाइन टाकून पुण्याकडून येणाऱ्या रेल्वे थेट शिर्डीत नेण्याचा घाट घालणारे रेल्वे जी एम कडून ही नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे. याशिवाय या रेल्वे मार्गावर रेल्वेने केलेले अंडर पास हे सोई पेक्षा गैर सोयीचेच आहेत. पावसाळ्यात यात एक एक मीटर पाणी साठल्याने यातून जाणे येणे बंद झाले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने कुणावरही कार्यवाही केली आहे. एकूणच रेल्वे प्रशासन रेल्वे ही त्यांची खाजगी संपत्ति असल्याच्या आविर्भावात जगत आहे. व प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट भाडे वसूल करून एक्सप्रेस सेवा पुरवीत आहे. या टिकीटाच्या रककमेवर जीएसटी शिवाय सेवा उपलब्ध करून दिल्याच्या नावाखाली प्रती तिकीट तीस रुपये आकारणी करून जनतेची लूट करीत आहेत. या लूटीत आमच सरकार शामिल आहे.
जनतेच्या अनेक अडचणी आहेत ,काय आणि किती लिहिणार . गेंडयाची कातडी पांघरलेली व्यवस्था आम्हीच निर्माण केली व स्वीकारली आहे. म्हणूनच तर पुंणतांबेकरांना ऐन स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याची वेळ आली आहे.