“करडई आर्थिकदृष्ट्या फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक”
एके काळी देशाचे ७१ टक्के करडईचे क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात होते. रब्बी ज्वारी पिकाच्या ठराविक ओळीनंतर करडईच्या ओळी पेरल्या जायच्या तसेच सलग करडईचे पिकही त्याकाळी घेतले जायचे. करडईच्या काढणीसाठी तसेच मळणी / बडवणीसाठी जसजशी मजुरांची उपलब्धता कमी कमी होत गेली तसतसे महाराष्ट्रातील करडईचे क्षेत्र कमी होत गेले.करडईच्या पानांवर असलेल्या काट्यांमुळे मजूर काढणी तसेच मळणीसाठी सहसा तयार होत नाहीत. अलीकडे करडई काढणी व मळणीसाठी यंत्रे आली आहेत परंतु त्याचा वापर अत्यल्प आहे. मात्र करडई तेलास मिळणारा बाजारभाव तसेच करडईपासून मिळणारी जनावरांच्या पेंडीची किंमत लक्षात घेता करडई हे रब्बी हंगामातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे गळीत धान्याचे पीक आहे.
बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करता येते मात्र यात एखादा दुसरा आठवडा मागेपुढे झाल्याने फारसा फरक पडत नाही. फुले कुसुमा, फुले चंद्रभागा ,फुले निरा ,फुले भिवरा, फुले गोल्ड व फुले किरण या करडईच्या जाती बागायती क्षेत्रात पेरणीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिफारस केल्या आहेत.
करडई पिकाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे खत व बियाणे एकाच वेळी पेरता येते.करडईचे एकरी ४ ते ५ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाणास ॲझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. ची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. करडईची पेरणी ४५×२० सें.मी. अंतरावर करावी.
सलग करडई लागवडीप्रमाणेच हरभरा + करडई (६:३ ) आणि जवस + करडई (४:२) या आंतरपीक पद्धतीचीही शिफारस आहे.
बागायती करडई पिकास एकरी ३० किलो नत्र (६५ किलो युरिया) + १५ किलो स्फुरद (९५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) पेरणीच्या वेळी द्यावे.
करडई पिकास आवश्यकतेनुसार पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले व ५५ ते ६० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. करडईवरील मावा नियंत्रणासाठी ॲसिफेट, ७५ एस पी, १६ ग्रॅम प्रति १० लि. पाणी या प्रमाणात पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी पहिली व ५५ ते ६० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .