शेतकरी बांधवांनो जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत खरिप पिकांची पेरणी करु नका.
महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात जूनअखेर अत्यल्प पाउस झाल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये (रत्नागिरी, कोल्हापूर वगळता) आतापर्यंत जास्तीत जास्त ५५ व कमीत कमी ५ मि.मी. पाउस पडलेला आहे. स्वतः राज्याचे कृषि मंत्री, कृषि विद्यापीठातील संशोधक व कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी पावसाळा सुरु झाल्यापासून शेतकरी बांधवांना सातत्याने सांगताहेत की, किमान १०० मि.मी. पाउस पडल्याशिवाय खरिप पिकांची पेरणी करु नका. कारण जमिनीत पुरेसा ओलावा नसला व बियाणे पेरले तर ते पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही. काही शेतकरी धुळ पेरणी करतात, धुळ पेरणी करायलाही हरकत नाही. मात्र कुठलेही बियाणे पेरल्यानंतर विशिष्ट कालावधीत जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही तर पेरलेलं बियाणे (धुळ पेरणीचं बियाणे देखील) पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही. अशा परिस्थिती त पुन्हा पावसानेओढ दिली तर दुबार पेरणीचं संकट उभं राहतं. पेरणीच्यावेळी पिकाला खत दिलेलं असेल तर महागडं बियाणं आणि खतांवरील खर्च वाया जातो.
तेंव्हा शेतकरी बांधवानो, सर्वजण कळकळीने सांगतात ते ऐका व कुठल्याही परिस्थितीत जोवर जमिनीत पुरेसा ओलावा होत नाही (किमान १०० मि.मी.) पाउस होत नाही तोवर खरिप पिकांची पेरणी करु नका. यातच तुमचा फायदा आहे
