“रब्बी पिकांसाठी प्राधान्याने करा तुषार सिंचनाचा वापर”
पडणाऱ्या पावसातील अनियमितपणा, जलसंवर्धनाचा अभाव व साठवलेले पाणी शेतीव्यतिरिक्त तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात वापरणे या सर्व बाबींमुळे शेतीतील पिकांसाठी पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. असे असले तरी आपल्या महाराष्ट्र राज्यातील पिकाखालील ओलीतच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होत आहे हेही दुर्लक्षिता येणार नाही. प्रचलित सिंचन पद्धतींबरोबरच पिकास पाणी देण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींच्या वापरामुळे ओलीताच्या क्षेत्रातही वाढ दिसून येते. ठिबक, तुषार या आधुनिक सिंचन पद्धतींमुळे पिकास पाहिजे त्यावेळी, योग्य प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पीक उत्पादनात वाढ होण्याबरोबरच जमिनीची प्रत टिकवणे व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणे हे ही फायदे झाल्याचे दिसून आले आहेत.
ठिबक सिंचन पद्धती एवढेच महत्त्व तुषार सिंचन पद्धतीला असून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी या दोन्हीही पद्धती अतिशय उपयुक्त आहेत. ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरासाठी शासनाकडून जसे अनुदान दिले जाते तसेच तुषार सिंचन पद्धतीच्या वापरासाठीही अनुदान दिले जाते. पूर्वीच्या तुलनेत तुषार संचाच्या किमतीही अलीकडे कमी झालेल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षात तुषार सिंचन पद्धतीचा ठिबक सिंचन पद्धतीएवढा प्रचार झालेला नाही आणि त्यामुळे तुषार सिंचन पद्धत अनेक बाबतीत चांगली असूनही या पद्धतीचा प्रसार व्हावा तेवढ्या प्रमाणात झाला नाही ही वस्तुस्थिती आहे.
रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या कमी अंतरावरील, कमी उंचीच्या बागायती पिकांसाठी उदा. हरभरा, भुईमूग या पिकांच्या संपूर्ण कालावधीत आणि गहू ,करडई, सूर्यफूल, बटाटा व इतर भाजीपाला पिकांच्या सुरुवातीच्या कालावधीत तुषार सिंचन पद्धत वापरता येते. विदर्भ व मराठवाड्यात अलीकडे रब्बी भुईमुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे. भुईमुगाची रुंद गादी वाफा पद्धतीत (इक्रिसॅट) लागवड करून तुषार सिंचन पद्धतीचा पिकास पाणी देण्यासाठी वापर केल्यास भुईमुगाच्या उत्पादनात निश्चितच वाढ होते. त्याचप्रमाणे ३ फूट अंतरावर शेतात सरसकट सऱ्या पाडून स-याच्या दोन्ही बगलेस वितभर अंतर अंतरावर हरभऱ्याची टोकन पद्धतीने लागवड करून तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास हरभऱ्याचे भरघोस उत्पादन मिळते. अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. दत्तात्रेय वने गेली अनेक वर्ष तुषार सिंचन पद्धतीवर हरभऱ्याचे उत्तम पीक घेत आहेत. डॉ. वने यांनी उसासाठी, गव्हासाठी आणि खरीप हंगामात भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला आहे व सध्याही करत आहेत. तुषार सिंचन पद्धतीचा विविध पिकांसाठी वापर करताना शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही पद्धत पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात वापरू नये. मात्र कुठल्याही पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात त्या पिकास पाण्याची गरज निश्चित असते त्यासाठी नेहमीच्या प्रचलित पद्धतीने पाणी देण्याचीही सोय करून ठेवावी.
अलीकडे रेनगन हा प्रकार उदयास येत आहे. हा देखील आधुनिक सिंचन पद्धतीचाच एक प्रकार आहे. तुषार सिंचन संचाच्या साह्याने ही पद्धत शेतकरी अगदी अल्प खर्चात वापरू शकतात. ज्या शेतकऱ्याकडे तुषार सिंचन संच असेल त्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकानुसार व प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीनुसार काही वेळा तुषारच्या तोटीद्वारे तर काही वेळा रेनगन तोटीद्वारे पीक क्षेत्र भिजविल्यास पिकाचे चांगले उत्पादन मिळते. रेनगन पद्धतीच्या वापरासाठी तुषार सिंचन संचाचे पाईप्स आहेत तसेच किंवा थोडेसे फेरबदल करून सहज वापरता येतात. रेनगन पद्धत देखील तुषार सिंचन पद्धती सारखीच उपयुक्त असून कमी अंतरावरची कमी उंचीच्या खुजा पिकांबरोबरच अगदी उसासारख्या उंच पिकासाठी सुरुवातीच्या काही कालावधीपर्यंत ही पद्धत अतिशय कार्यक्षमतेने वापरता येते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत