“खरीप पिकांच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था- भाग १”
खरीप हंगामात घेतलेली पिके सहसा पावसाच्या पाण्यावर (जर पाऊस समप्रमाणात सतत पडत राहिला तर) निश्चितच चांगली उत्पादन देतात. पावसामध्ये खंड पडत राहिला आणि त्यादरम्यान खरीप पिकांच्या संवेदनक्षम अवस्था येत असल्या तर मात्र खरिप
पिकाच्या उत्पादनात कमालीची घट येते. मात्र ज्या शेतकरी बांधवांकडे खरीप हंगामामध्ये एखादे दुसरे पाणी उपलब्ध असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात पिकाची बागायती पीक म्हणून लागवड केली असेल त्या शेतकरी बांधवांनी मोठा पावसाचा खंड पडलेला असताना खरीप पिकांना त्यांच्या संवेदनक्षम अवस्थेत आवर्जून पाणी द्यावे. साधारणपणे हलकी जमीन असेल तर प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये ५ ते ६ सें.मी. उंचीचे पाणी पिकास द्यावे, मध्यम जमीन असेल तर ६ ते ८ सें.मी. आणि भारी जमीन असेल तर प्रत्येक पाण्याच्या पाळीत ८ ते १० सें.मी. पाणी पिकास द्यावे.
खरीप हंगामात घेतलेले मूग आणि उडीद ही पिके कमी कालावधीची असतात. त्यामुळे अशा पिकांना आवश्यकतेनुसार पेरणीनंतर २५ दिवसांनी आणि पुन्हा गरज पडली तर त्यानंतर २० ते २५ दिवसांनी पाणी द्यावे.
कापूस पिकाच्या महत्त्वाच्या अशा पाणी देण्याच्या ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्यामध्ये उगवण, फांद्या फुटणे, पाते लागणे, फुले लागणे, बोंडे धरणे आणि बोंडे भरणे या पाणी देण्यासाठी संवेदनक्षम अवस्था आहेत. साधारणपणे कापूस पिकाला खरीप हंगामामध्ये एकूण ४५ ते ५० सें.मी. पाण्याची गरज असते.
खरीप ज्वारी पिकाची पाण्याची एकुण गरज ४० ते ४५ सें.मी. असून हे पाणी खरीप ज्वारीला साधारणपणे ४ पाण्याच्या पाळयातून देणे गरजेचे असते. त्यासाठी खरीप ज्वारीच्या गर्भावस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी), पोटरी अवस्था (५० ते ५५ दिवस), फुलोरा अवस्था (७० ते ७५ दिवस) आणि दाणे भरण्याची अवस्था (९० ते ९५ दिवस) या अवस्था संवेदनक्षम अवस्था आहेत.
मका पिकास पाण्याची एकूण गरज ४० ते ४२ सें.मी. एवढी असते आणि ही गरज भागविण्यासाठी मका पिकास रोप अवस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवस) तुरा बाहेर पडताना (४५ ते ५० दिवस), फुलोरा अवस्था (६० ते ६५ दिवस) आणि दाणे भरताना (७५ ते ८० दिवस) या महत्त्वाच्या संवेदनक्षम अवस्थांमध्ये पाणी देणे गरजेचे असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .