उन्हाळी हंगामात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने उसासारख्या पिकामध्ये शेंड्याकडील पूर्ण उघडलेली ६ ते ७ पाने ठेवून खालच्या बाजूची उरलेली सर्व पाने काढून टाकल्यास पानांद्वारे होणारे पाण्याचे पर्णोत्सर्जन कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे पाने कमी केल्याने उसाच्या उत्पादनात घट न येता कमी पाण्यावर ऊस येऊ शकतो तसेच उसासाठी द्यावयाच्या पाण्याच्या दोन पाळयातील अंतरही वाढविता येते.
पिकांना लागणारे पाणी पीक त्यांच्या मुळांद्वारे घेत असल्याने पिकांची मुळे जमिनीत जितकी खोल गेली असतील त्या खोलीपर्यंत असलेलेच पाणी मुळे घेऊ शकतात. त्याच्यापेक्षा खोल थरातील पाणी मुळांना घेता येत नाही. ते निचऱ्याद्वारे जमिनीच्या खालच्या थरात निघून जाते म्हणून मुळांच्या खोलीपेक्षा खाली गेलेले पाणी हे पिकाच्या दृष्टीने अनुत्पादक आणि जमिनीच्या दृष्टीने अपायकारक ठरते. पाण्याच्या अती वापरामुळे जमिनी खारवट आणि पाणथळ होतात म्हणून पिकांना पाणी देताना शक्यतो मुळांच्या खोलीइतकीच जमीन भिजेल अशाप्रकारे पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता असल्याने हे करणे अतिशय गरजेचे असते.
उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता अतिशय कमी असेल तर फळझाडांसाठी मडका सिंचन पद्धत वापरल्याने पाण्याची सुमारे ६० टक्के बचत होते. काही प्रसंगी उन्हाळी हंगामात फळझाडे किमान जगविणे देखील आवश्यक असते. अशा परिस्थितीत मडका सिंचन पद्धतीचा वापर करताना प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ आवश्यकतेनुसार १ किंवा २ मडकी गळ्यापर्यंत मातीत पुरावी. मात्र मडकी जमिनीत पुरण्यापूर्वी त्यांच्या तळाशी एक छोटेसे छिद्र पाडून त्यात चिंधी अडकवावी. त्याचप्रमाणे उष्णतामानानुसार दिवसातून १ किंवा २ वेळा ही मडकी पाण्याने भरावीत.
या व्यतिरिक्त पाण्याचा कार्यक्षम वापर करणाऱ्या तसेच पाण्यात बचत करणाऱ्या ठिबक, तुषार किंवा रेणगन या आधुनिक सिंचन पद्धतींचाही उन्हाळी पिकांसाठी वापर करावा. या सिंचन पद्धतींच्या वापराने पाण्याच्या साठ्यापासून उपसलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या मुळांच्या कक्षेत पोहचविला जातो. ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची ५० ते ६० टक्के बचत होऊन पीक उत्पादनातही १५ ते २० टक्के वाढ होते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .