सूर्यफुलाचे पीक वर्षातील तिन्ही हंगामात घेतले जात असले तरी उन्हाळी हंगामात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन केले तर इतर दोन हंगामापेक्षा या पिकाचे उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त उत्पादन मिळते.
सूर्यफूल हे उन्हाळी हंगामात घेतले जाणारे दुसरे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. योग्य संकरित वाण, शिफारस केलेल्या खताच्या मात्रा आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यास सूर्यफुलाचे हेक्टरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून रोपवस्था, फुलकळ्या लागण्याची अवस्था, पीक फुलावर येण्याची अवस्था तसेच दाणे भरण्याची अवस्था या सूर्यफुलाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था आहेत.
उन्हाळी सूर्यफुलाच्या पिकाला पाणी देण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे सारे पद्धत ही आहे. त्यासाठी जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि उताराच्या दिशेने सुमारे ३ ते ४ मीटर रुंदीचे सारे पाडणे गरजेचे असते तसेच या साऱ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार योग्य प्रमाणात ठेवावी लागते.
सर्वसाधारणपणे सूर्यफुलाच्या पिकाला उन्हाळी हंगामात एकूण ३० सेंटिमीटर पाणी लागते. हे पाणी प्रत्येक पाळीत ६ सेंटीमीटर याप्रमाणे एकूण ४ ते ५ पाण्याच्या पाळयांमधून द्यावे. त्यासाठी पीक रोपावस्थेत असताना (पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी), फुलकळ्या लागण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), पीक फुलावर असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) व त्यानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
जर केवळ २ पाळ्यांचे पाणी उपलब्ध असेल तर ते कळी येण्याच्या अवस्थेत दोन वेळा आणि ३ पाळयांचे पाणी उपलब्ध असेल तर ते रोपावस्था, कळी अवस्था व दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे.
सूर्यफूल पिकाच्या पाणी नियोजनात एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे बियाणे तयार होत असताना फुले खाली वाकू लागतात, अशावेळी पिकास पाणी देऊ नये. सूर्यफुलाची झाडे जमिनीवर
लोळण्याची
आणि पर्यायाने बियाण्याची प्रत खराब होण्याची शक्यता असते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .