भरपूर पाणी उपलब्ध असणाऱ्यांचा गहू लागवडीकडे कल
मात्र गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी हवामानाची अनुकूलता आवश्यक
महाराष्ट्र राज्यात सरासरी १० लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होते. ज्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहते व रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता चांगली असते त्यावर्षी गहू लागवड क्षेत्रात अर्थातच वाढ होते.मध्यम ते भारी जमिनीत घेतलेल्या गव्हाच्या पिकासाठी २१ दिवसांच्या अंतराने एकूण ५ पाण्याच्या पाळ्या देण्याची (लागवडीच्या वेळी देण्याची पाण्याची पाळी धरुन) शिफारस आहे तर हलक्या जमिनीत घेतलेल्या गव्हाच्या पिकास १५ दिवसाच्या अंतराने एकूण ७ पाण्याच्या पाळ्या देण्याची शिफारस आहे. हलक्या जमिनीत गव्हाची लागवड करायची शिफारस नाही. प्रत्यक्षात शेतकरी मध्यम ते भारी जमिनीत पाण्याच्या उपलब्धतेनुसार ७ ते ८ पाण्याच्या पाळ्या व हलक्या जमिनीतील गव्हास १० ते १२ पाण्याच्या पाळ्या देतात. त्याचप्रमाणे प्रत्येक पाण्याच्या पाळीत सरी पूर्ण भरून पाणी देतात जे शिफारशीपेक्षा किमान तिप्पट दिले जाते. जास्तीच्या संख्येने आणि मात्रेने दिलेल्या पाण्यामुळे गहू पिकास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊन उत्पादनात घट येते. या तुलनेत गव्हाऐवजी हरभरा पीक घेतले तर तेवढ्याच पाण्यात किमान तीनपट क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड होऊ शकते.
पाण्याची कितीही उपलब्धता असली आणि उपलब्ध पाणी गहू पिकास मनसोक्तपणे दिले तरी गव्हाचे उत्पादन हे रब्बी हंगामात हवामान कसे राहते यावर बहुतांशी अवलंबून असते. साधारणपणे गव्हाच्या मुख्य वाढीच्या काळात सुमारे ३० ते ३५ दिवस तापमान सातत्याने १० डिग्री सेल्सियसच्या आत राहिले तर गव्हाचे उत्पादन चांगले मिळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात गहू पीक साधारणपणे १०५ ते ११० दिवसात काढणीसाठी तयार होते तर उत्तर भारतात, हरियाणा- पंजाब राज्यात गव्हाचा कालावधी १४० ते १५० दिवस एवढा प्रदिर्घ असतो. उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा कालावधी तसेच प्रमाण महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याने त्या राज्यातील गव्हाचे उत्पादन एकरी ३५ ते ४० क्विंटल मिळते तर महाराष्ट्रात केवळ १५ ते २० क्विंटल एवढेच गव्हाचे एकरी उत्पादन मिळते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .