” पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर “

ज्याप्रमाणे आजाराकरिता डॉक्टरांनी दिलेली गोळयाऔषधी आपण योग्य वेळी, योग्य प्रमाणात घेऊन आपली तब्येत चांगली करतो अगदी त्याचप्रमाणे पिकांसाठीही रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे असते. पिकांना त्यांच्या योग्य वाढीच्या अवस्थेत कृषितज्ञांनी शिफारस केलेली मात्रा योग्य प्रमाणात दिल्यास पिकांची जोमदार वाढ होऊन भरघोस पिक उत्पादन तर मिळतेच परंतु त्याचबरोबर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी खराब होण्याचा प्रकारही होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. त्याचप्रमाणे किमान वर्षातून एकदा शेणखतासारख्या वरखतांचाही ( हेक्टरी 12/15 टन ) आवर्जून वापर करावा जेणेकरून जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होते.
पिकांसाठी सरळ खते वापरत असताना युरिया खतात 46% नत्र असते (त्यासाठी 2.17× शिफारशीत नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट खतात 16% स्फूरद (6.25 × शिफारशीत स्फूरद) व म्यूरेट ऑफ पोटॅश या खतात 58% पालाश (1.72× शिफारशीत पालाश) असते.त्याकरिता खरिप पिकांना सरळ खताची मात्रा देताना कंसात दिल्याप्रमाणे अनुक्रमे नत्र,स्फूरद व पालाश शिफारशी प्रमाणे वापरावे. सरळ खतानंतर डीएपी हे संमिश्र खत शेतकरी बांधव जास्त प्रमाणात वापरतात.डीएपी खतात 18% नत्र व 46% स्फूरद असते, नत्र व स्फूरदची शिफारशीत मात्रा खरिप पिकांना देताना योग्य प्रमाणात डीएपी खत वापरावे.
खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन -
अ. कडधान्ये –
- मूग / उडीद –
मूग व उडीद पिकांसाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 20 कि. नत्र व 40 कि. स्फूरद देण्याची शिफारस असून ही मात्रा मूग /उडीद पिकास 100 किलो डीएपी खतातून द्यावी. - सोयाबीन –
सोयाबीन पिकासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 50 कि. नत्र (110 कि. युरिया), 75 कि. स्फूरद ( 450 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) व 45 कि. पालाश (75 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) देण्याची शिफारस आहे. - तूर –
तूर पिकासाठी पेरणीच्यावेळी प्रतिहेक्टरी 25 कि. नत्र व 50 कि. स्फूरदची शिफारस असून ही मात्रा प्रति हेक्टरी 125 कि. डीएपी खतातून द्यावी.
ब. गळीत धान्य – - सूर्यफूल –
कोरडवाहू सूर्यफूल पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 50 कि. नत्र (110 कि.युरिया), 25 कि.स्फूरद (150 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) व 25 कि.पालाश (40 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
- बागायती सूर्यफूल पिकास पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी 30 कि. नत्र (65 कि. युरिया), 60 कि. स्फूरद (375 कि. सिगल सुपर फॉस्फेट), 60 कि.पालाश (100 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 कि. नत्र (65 कि. युरिया) द्यावे.
क. तृणधान्ये –
- खरिप ज्वारी –
ज्वारी पिकास खरिप हंगामात पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी 50 कि. नत्र (110 कि. युरिया ), 50 कि. स्फूरद (300 कि. सिंगल सुपर फॉस्फेट), 50 कि. पालाश (85 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 कि. नत्र (110 कि. युरिया) जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे. - बाजरी –
बाजरी पिकास पेरणीच्यावेळी प्रति हेक्टरी 25 कि. नत्र (55 कि. युरिया), 25 कि. स्फूरद (150 कि. सिंगल सुपर फॉस्फेट ), 25 कि. पालाश (40 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) आणि पेरणी नंतर 30 दिवसांनी 25 कि. नत्र (55 कि. युरिया) द्यावे. - मका –
मका पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 कि. नत्र (88 कि. युरिया), 60 कि. स्फूरद (375 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 कि. पालाश (70 कि. म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणी नंतर 30 दिवसांनी 40 कि. नत्र (88 कि. युरिया) आणि पेरणी नंतर 40/45 दिवसांनी नत्राचा तिसरा हप्ता, 40 कि. नत्र (88 कि. युरिया) द्यावा.
सरळ खतांमध्ये दर्शविल्याप्रमाणे नत्र, स्फूरद व पालाशचे प्रमाण प्रत्यक्षात तेवढेच आढळते आणि मिश्र खतांच्या तुलनेत सरळ खते शेतकरी बांधवाना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .