माध्यमांचे अर्थकारण हे जाहिरात क्षेत्र चालवत आहे. जाहिरात हा व्यवसाय कल्पकतेचा असून, ती वाढविण्यासाठी संघटनेने विविध उपक्रम घ्यावे , यासोबतच जाहिरात दारांनी बदलत्या काळसोबत आपली माध्यम बदलली पाहिजे. असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक संपादक उत्तमराव कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय जाहिरातदिनानिमित्त मंगळवारी (दि.१४ ) गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात नावातर्फे (नाशिक ॲडर्व्हटायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन) जाहिरात दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नावाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप निकम, फेमचे अध्यक्ष रवी पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

उत्तम कांबळे पुढे म्हणाले की , जगभरात औद्योगिक क्रांतीने नवनवे उत्पादने निर्मिती वाढली. याची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे सर्वात सोपे साधन म्हणजे जाहिरात करणे. याचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे. त्यासाठी डिजिटल माध्यम प्रचलित झाली आहे. आता गाडीचे, मोबाईलचे, सिनेमाचे उत्पादन झालेेले नसतांनाही जाहिरात तयार होते आणि ते ग्राहकांच्या मनाचा वेध घेते हीच जाहिरातीची ताकद आहे. विक्रेते जाहिरातीच्या माध्यमातून मार्केट जिंकतात. अन्न, वस्त्र निवाऱ्याबरोबरच जाहिरातीचीही समाजाला गरज आहे. जाहिरात म्हणजे कल्पकता , माध्यमांसोबत ग्राहकाला सुद्धा जाहिरातीची आवश्यकता असते, जाहिरात एजन्सीज डीक्टेटर झाल्या आहेत, जाहिरातीची विश्वासार्हता टिकवणे हे जाहीरात एजन्सीचे कर्तव्य आहे. आपण जाहीरात नाही तर आयडिया विकतो असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन नावाचे सल्लागार संचालक डॉ अभिजित चांदे यांनी तर दिलीप निकम यांनी आभार मानले.
