लाभक्षेत्रात आर्थिकदृष्ट्या जास्तीत जास्त किफायतशीर पीक पद्धतीसाठी स्थानिक हवामानात वाढणाऱ्या पिकांची निवड, बाजारपेठेची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, खोली, उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण, मजुरांची उपलब्धता, साधनसामग्री, आर्थिक तजवीज, सुधारित कृषी तंत्रज्ञानाची माहिती व वापर, इ. बाबी विचारात घेऊन पीक पद्धतीची आखणी करावी.
कुठल्याही धरणात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यास बहुतेक शेतकऱ्यांचा कल उसाचे पीक घेण्याकडे प्रामुख्याने असतो. याउलट पाण्याची धरणातील उपलब्धता पाहूनच ऊस पिकाचे नियोजन केले जाते. पूर्वहंगामी, सुरू आणि आडसाली या प्रकारांपैकी सहसा सुरू उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो कारण हे पीक साधारणपणे वर्षभरात कारखान्यात गाळपासाठी जाते आणि दरवर्षाला नवी लागवड करता येते अथवा त्याच पिकाचा खोडवा घेता येतो. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या लक्षात घेता आणि जो काही ऊस उत्पादन केला जातो त्या सर्वांचे निश्चित गाळप होणार व हमखास पैसा देणारे नगदी पीक म्हणून लाभ क्षेत्रात उसाची लागवड वाढणे साहजिकच आहे. परंतु एकच एक पीक वर्षानुवर्षे त्याच त्याच जमिनीत घेतल्याने व जमिनीची पाहिजे तेवढ्या प्रमाणात मशागत होत नसल्याने जमिनीच्या तब्येती बिघडण्यास फारसा वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे ऊसाला प्रत्येक पाण्याच्या पाळीत शिफारस केल्याच्या ४ ते ५ पट जास्तीचे पाणी दिल्याने जमिनी खारवट, क्षारपड बनतात आणि सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून उसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन कमी मिळते. भाजीपाल्याचे, अन्नधान्ये व इतर पिकांचे सरासरी हेक्टरी उत्पादन एकीकडे वाढत आहे मात्र ऊस हे एकच पीक असे आहे की दिवसेंदिवस या पिकाचे उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे ज्या लाभक्षेत्रात 12 महिने पाणी उपलब्ध आहे अशा लाभक्षेत्रात वर्षभर केवळ एकच पीक न घेता वर्षातील तीनही हंगामात निरनिराळी पिके घेतली तर निश्चितच जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो. एकाच जमिनीत वर्षभरात तीन पिके घेतल्याने पिकाची घनता ३०० टक्के तर होतेच परंतु पीक चक्रात निरनिराळ्या लागवडीने नंतरच्या पिकांना काही प्रमाणात फायदा होऊन दोन्ही/तिन्ही हंगामातील पिकांचे उत्पादन वाढण्यासही मदत होते. पीक पद्धतीत कडधान्ये अथवा द्विदल धान्यांचा अंतर्भाव केल्याने हवेतील नत्राचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण तर होतेच परंतु या पिकांचा पाला मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने चांगले बेवडही मिळते.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन शेतात पिकांची आखणी अशा पद्धतीने करावी की घेतलेल्या पीक उत्पादनास चांगला बाजारभाव मिळेल, मजुरांची बचत होईल तसेच उपलब्ध मजुरांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेता येईल, जमिनीचा कसही टिकून राहील आणि पीक उत्पादकतेत स्थिरता राहील.
लाभक्षेत्रात आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पीक पद्धतीः
ऊस -ऊस खोडवा-हिरवळीचे खत-कापूस-भुईमूग-मिरची
ऊस -भुईमूग-ऊस खोडवा-गहू
कापूस-उन्हाळी भुईमूग
उडीद-रब्बी ज्वारी-उन्हाळी
भुईमूग
भुईमूग (खरीप)-गहू-उन्हाळी भाजीपाला
बाजरी-गहू-हिरवळीचे खत
ज्वारी (खरीप)-कोबी-उन्हाळी भुईमूग
ज्वारी (खरीप)-गहू-हिरवळीचे खत # बाजरी-हरभरा-उन्हाळी भाजीपाला