लाभक्षेत्रात पाण्याची उपलब्धता सहज होत असल्याने बेसुमार वापर केला जातो. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच परंतु जमिनीही काही कालावधीत लवकर खराब होतात. रासायनिक खतांच्या वापराने जमिनी खराब झाल्या असा सध्या बोलबला आहे परंतु खऱ्या अर्थाने जमिनी खराब होण्यास अतिरिक्त पाण्याचा वापरच कारणीभूत आहे.
भरपूर पाणी दिल्यास चांगले उत्पादन येईल असा शेतकऱ्यांचा समज आहे तसेच विशेषतः लाभक्षेत्रात पाण्याचे पुढचे आवर्तन पुन्हा नेमके कधी येईल आणि आल्यानंतर आपल्या वाट्याला पुरेसे पाणी येईल की नाही या संभ्रमावस्थामुळेही शेतकरी पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी देतात. या जास्तीच्या दिलेल्या पाण्यामुळे पिकांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. कारण राज्यातील लाभक्षेत्रातील बहुतेक जमिनी भारी प्रकारात मोडतात. या जमिनीची जलधारणाशक्ती जास्त असल्याने पाणी दिल्यानंतर जमीन वाफस्यावर येण्यासाठी किमान ७ ते ८ दिवस लागतात. जमीन वाफस्यावर आल्याशिवाय कुठलेही पीक थेंबभरही पाणी घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जमिनीतील अन्नद्रव्यांचे शोषणही होत नाही. त्यामुळे भरमसाठ दिलेल्या पाण्यामुळे पाण्याच्या प्रत्येक पाळीनंतर शेतकरी पिकाचे एक प्रकारे नाक आणि तोंड दाबतात आणि पिकाला म्हणतात आता वाढ. याचे उदाहरण म्हणजे उसाचे पीक. एकेकाळी एकरी १०० टन उत्पादन देणाऱ्या या पिकाची सध्याची उत्पादकता केवळ ३५ ते ४० टन प्रती एकर एवढी घसरलेली आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे शेतकरी उसासाठी करीत असलेला पाण्याचा अतिरिक्त वापर हे आहे.
लाभक्षेत्रातील जमिनी बहुतांशी भारी असल्याने या जमिनीत पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने हजारो हेक्टर जमिनी पाणथळ तसेच क्षारपड झाल्या आहेत आणि त्याची पिकासाठी पाण्याचा गरजेपेक्षा जास्त वापर व कालव्याचे झिरपणारी पाणी हे दोन मुख्य कारणे आहेत.
निचऱ्याचीव्यवस्था न केल्यामुळे होणारे दुष्परिणामः
पिकांच्या मुळांच्या कक्षेत खेळत्या हवेचे तसेच प्राणवायूचे प्रमाण घटते. त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता कमी होते व पिकास अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते
जमिनीचे तापमान कमी झाल्याने बियाण्याची उगवण कमी होते
उपलब्ध नत्राचे प्रमाण घटते
मशागत करणे कठीण होते
जमिनीत नको असलेल्या तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते व पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो
जमिनीतील क्षारांच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांना अन्नद्रव्य घेणे कठीण होते
या लेखाचे लेखक डॉ.कल्याण देवळाणकर हे सेवा निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहेत.