उन्हाळी हंगामातील पीक उत्पादनास मिळणारा बाजारभाव लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांचा उन्हाळी पिके घेण्याकडे कल असतो. मात्र अनेक वेळा संपूर्ण उन्हाळी हंगामात उपलब्ध पाणी त्यांनी घेतलेल्या पिकाच्या एकूण कालावधीत त्यांच्या पाण्यासाठी गरजेच्या महत्त्वाच्या अवस्थेत देण्यासाठी पुरत नाही व त्यामुळे पीक उत्पादनात खूपच घट येते किंवा काही वेळा संपूर्ण पीक हातचे जाण्याची भीती निर्माण होते. यासाठी पूर्वानुभावावरून तसेच पडलेल्या पाऊसमानाचा विचार करून आपल्याकडे उपलब्ध पाणी नेमक्या किती क्षेत्रावर घेतलेल्या पिकासाठी संपूर्ण उन्हाळी हंगामानुसार पुरेसे होईल याचा निश्चित अंदाज घेऊनच पीक व त्याचे नेमके क्षेत्र निवडणे गरजेचे असते. यात जमिनीचा प्रकारही लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे असते.
कुठल्याही पिकाच्या पाणी व्यवस्थापनात पाण्याची नेमकी किती मात्रा पिकाच्या कोणत्या अवस्थेत, कशाप्रकारे द्यावी याचा प्रामुख्याने समावेश होतो. जमिनीच्या जलधारणा
शक्तीनुसार पाण्याची नेमकी मात्रा ठरवावी लागते. भारी, काळया जमिनीची जलधारणा शक्ती जास्त असते तर मध्यम जमिनीची मध्यम आणि हलक्या जमिनीची जलधारणा शक्ती अतिशय कमी असते. त्यामुळे भारी जमिनीत घेतलेल्या पिकात जास्त अंतराने प्रत्येक पाळीत ७ ते १० सेंटिमीटर खोलीचे पाणी द्यावे लागते आणि हलक्या जमिनीत कमी अंतराने प्रत्येक पाळीत ६ ते ८ सेंटीमीटर खोलीचे पाणी पिकास प्रत्येक पाळीत देणे गरजेचे असते. प्रत्येक पिकाच्या पाणी देण्याच्या महत्त्वाच्या अवस्था ठरलेल्या असतात. उन्हाळी हंगामात घेतलेल्या कुठल्याही पिकासाठी उगवणीचा काळ अतिशय महत्त्वाचा असल्याने कुठल्याही परिस्थितीत जमीन अगोदर ओलवूनच पिकाची पेरणी करणे जास्त संयुक्त ठरते. त्यानंतर फुलोऱ्याचा काळ हा पिकास पाणी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
सर्वसाधारणपणे अन्नधान्य, तेलबिया किंवा भाजीपाल्याच्या पिकांबाबत फुलोरा ते दाणे भरणे अथवा फळवाढीचा काळ पिकास पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे अपेक्षित पीक उत्पादन मिळवण्यासाठी पिकाच्या विशिष्ट अवस्थेत पिकास पाणी देणे खूपच गरजेचे असते. दिलेले पाणी पिकास व्यवस्थित बसण्यासाठी योग्य प्रकारची रानबांधणी करणे गरजेचे असते. पिकाच्या प्रकारानुसार रुंद वरंबा, सरी-वरंबा, वाफे पद्धत, आळे पद्धत, रुंद गादी वाफा, इ. रानबांधणीचा अवलंब करावा. कमी अंतरावरच्या पिकासाठी रुंद वरंबा, वाफे पद्धत किंवा रुंद गादी वाफा, इ. रानबांधणीचा अवलंब करावा. कमी अंतरावरच्या पिकांसाठी रुंद वरंबा, वाफे पद्धत किंवा रुंद गादी वाफा पद्धत अवलंबावी तर वेलवर्गीय भाजीपाला, फळझाडे यांच्यासाठी आळे पद्धत आणि ज्या पिकांवर जास्त वजनांची फळे लागतात असे वांगे, टोमॅटो, मिरची, इ. पिकांसाठी सरी-वरंबा पद्धत वापरणे फायदेशीर ठरते. शिफारस केलेल्या रानबांधणीचा वापर करून विशिष्ट पिकास प्रचलित पद्धतीने पाणी देताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते कारण उन्हाळी हंगामात पाण्याचा थेंब् न थेंब् महत्त्वाचा असतो. रुंद वरंबा थवा सारे पद्धतीत सारा सुमारे ९० टक्के भरल्यानंतर पाणी तोडणे गरजेचे असते. वाफे किंवा आळे पद्धतीत वाफे किंवा आळ्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी देऊन वाफे/आळे फुटणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे रुंद गादी वाफा पद्धतीवर घेतलेल्या पिकांना सरीतून पाणी देताना सरी पूर्ण भरणे गरजेचे असले तरी रुंद गादी वाफ्यावर पाणी पसरून देणे पिकाच्या दृष्टीने हितावह असते. सरी-वरंबा पद्धतीतही पूर्ण सरी भरून पाणी देणे म्हणजे पाण्याचा अपव्यय करणे हे लक्षात ठेवावे. त्यासाठी सऱ्या शक्यतो फार खोल नसाव्यात आणि खोल असल्या तरी त्या पूर्ण भरू नयेत.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .