भाजीपाल्याच्या पिकाबरोबरच उन्हाळी भुईमूग या तेलबिया पिकाच्या लागवडीकडे उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांचा बराचसा कल असतो. भुईमुगाच्या पिकात उन्हाळी हंगामात मशागतीच्या किंवा व्यवस्थापनाच्या इतर तंत्राच्या तुलनेत पाणी नियोजनास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पिकास ज्याप्रमाणे पाण्याचा ताण सहन होत नाही त्याचप्रमाणे जास्त पाणी देखील सहन होत नाही. म्हणूनच भुईमुगासाठी इक्रिसॅट पद्धतीने, रुंद गादीवाफा पद्धतीवरची लागवड करण्याची शिफारस केलेली आहे.
भुईमूग पिकाच्या पाणी देण्याच्या दृष्टीने वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था म्हणजे सुरुवातीची वाढीची अवस्था, फांद्या फुटणे, जमिनीत आऱ्या उतरणे, शेंगा पोसणे आणि पीक परिपक्व होणे या आहेत. पिकाच्या पेरणीनंतर सुरुवातीच्या ३० ते ३५ दिवसांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पिकास दिले गेल्यास पिकाची कायिक वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे पिकाचा फुलोरा व शेंगा पोसण्याच्या अवस्थेत, सुमारे दोन महिन्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडल्यास देखील पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच भुईमुगाच्या वाढीच्या महत्त्वाच्या विशिष्ट अवस्थेत पाणी नियोजनास अत्यंत महत्त्व आहे.
उन्हाळी भुईमुगाला एकूण ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. हे पाणी एकूण ११ ते १२ पाण्याच्या पाळयात द्यावे. प्रत्येक पाण्याच्या पाळीत साधारणपणे ६ ते ७ सें.मी. उंचीचे पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय न होता पिकाची वाढही चांगल्या प्रकारे होते. पाण्याच्या दोन पाळयातील अंतर मध्यम ते भारी
जमिनीत सुमारे १० दिवस व हलक्या जमिनीत ७ ते ८ दिवस ठेवणे फायदेशीर ठरते. मात्र हलक्या जमिनीत कमी मात्रेत परंतु कमी अंतराने पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याच्या एकूण पाळ्याही जास्त द्याव्या लागतात.
उन्हाळी भुईमूगाला पाण्याच्या पाळ्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नेमक्या कधी द्याव्यात याविषयी झालेल्या संशोधनानुसार सुरुवातीला पेरणीपूर्वी शेताला ओलवणीचे पाणी दिल्यानंतर पिकाची उगवण चांगली होण्यासाठी पेरणी झाल्यानंतर लगेचच एक हलके पाणी द्यावे. अशाप्रकारे पेरणीच्या दरम्यान १० दिवसात दोन पाणी, पेरणीनंतर १० ते ३० दिवसात फुले येण्याच्या अगोदर एक पाणी, पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांदरम्यान, साधारणपणे पिकास ५० टक्के फुले येतात त्यादरम्यान दोन पाणी आणि पेरणीनंतर ५० ते ८० दिवसात, ज्यावेळी आ-या जमिनीत उतरून शेंगा तयार व्हायला लागतात तसेच त्या पोसतात अशा काळात एकूण तीन पाणी भुईमुगाच्या पिकाला उन्हाळी हंगामात द्यावे. पेरणीनंतर ८० ते ९० दिवसात आणि ९० ते १०५ दिवसात प्रत्येकी दोन पाणी आणि त्यानंतर शेवटी पेरणीनंतर १०५ ते १२० दिवसाच्या कालावधीत फक्त एक पाणी द्यावे. एकंदरीत सहाव्या पाण्यापासून दोन पाण्यात सुमारे १० दिवसाचे अंतर ठेवावे. पाण्याच्या बचतीच्या दृष्टीने व भुईमुगाच्या भरघोस उत्पादनासाठी भुईमुगाची लागवड रुंद गादीवाफा पद्धतीवर करून तसेच पिकास पाणी देण्यासाठी तुषार किंवा रेनगन सिंचन पद्धतीचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .