“रब्बी तेलबिया पिकांचे पाणी व्यवस्थापन”
करडई, मोहरी व सूर्यफूल या पिकांपैकी करडईचे पीक बहुतांशी कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. मात्र मोहरी व सूर्यफूल पिकांबरोबरच करडईसाठी ही योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन केले तर निश्चितच उत्पादनात भरीव वाढ होते.
सूर्यफूल हे पीक तीनही हंगामात येत असले तरी रब्बी हंगामात घेतलेल्या सूर्यफुलासाठी योग्य तऱ्हेने पाणी व्यवस्थापन केले तर इतर हंगामाच्या तुलनेत या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळते. बाष्पीभवन गुणाकांवर आधारित पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये असे आढळून आले आहे की ०.७५ बाष्पीभवन गुणांकानुसार प्रत्येक पाळीत ६ सें.मी. उंचीचे पाणी दिल्यास सूर्यफुलाचे पीक भरपूर उत्पादन देते. अशावेळी या पद्धतीनुसार सूर्यफूल पिकास एकूण चार पाण्याच्या पाळया द्याव्यात. सूर्यफूल पिकाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्थांचा विचार करताना पिकास पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी रोपावस्थेत, पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी फुलकळ्या लागण्याच्या अवस्थेत, पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना आणि पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी दाणे भरण्याच्या अवस्थेत एकूण चार पाण्याच्या पाळया दयाव्यात. सूर्यफूल पिकाची रब्बी हंगामात एकूण पाण्याची गरज सुमारे ४५ सें.मी. एवढी असते.
करडईचे पीक बहुदा कोरडवाहू पीक म्हणूनच घेतले जाते कारण या पिकाची मुळे जवळपास १ मीटर खोलवर जाऊन जमिनीच्या खालच्या थरातून पाणी शोषून घेते. असे असले तरी करडई पिकासाठी योग्य पद्धतीने पाणी नियोजन केले तर कोरडवाहू पिकाच्या तुलनेत बागायती पिकापासून दोन ते अडीच पट जास्त उत्पादन मिळते. त्यासाठी करडई पिकास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पिकाच्या लुसलुशीत वाढीच्या अवस्थेत पहिले पाणी व पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक फुलो-यावर असताना दुसरे पाणी द्यावे. पहिल्या पाण्याचा पिकास जास्तीत जास्त फांद्या फुटण्यासाठी व दुसऱ्या पाण्याचा बी चांगले भरण्यासाठी उपयोग होतो. केवळ एकच पाणी द्यावयाची सोय असेल तर ते पाणी पेरणीनंतर ५० ते ६५ दिवसांनी द्यावे. मात्र पाणी देताना करडई पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. करडई पिकाची एकूण पाण्याची गरज २५ ते ३० सें.मी. एवढी असते.
मोहरी पिकाची एकूण पाण्याची गरज १८ ते २० सें.मी. एवढी कमी असली तरी पिकाची पाण्याची ही गरज पाण्याच्या प्रत्येक पाळीत पिकास हलके पाणी देऊन एकूण तीन पाण्याच्या पाण्यामधून भागवावी. त्यासाठी पहिले पाणी पेरणीच्यावेळी, दुसरे पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आणि तिसरे पाणी पीक फुलावर येण्याच्या वेळेस म्हणजे पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी द्यावे.
भुईमुगाचे पीक रब्बी हंगामात नव्याने घेतले जात असल्याने पीक व्यवस्थापनाच्या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. खरीप किंवा उन्हाळी हंगामाच्या तुलनेत भुईमुगाची रब्बी हंगामातील पाण्याची गरज कमी असते. त्यातही पाण्याचा तुटवडा असेल तर या पिकासाठी अगदी पेरणीच्या पूर्वतयारी पासून तुषार सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केले तर चांगले उत्पादन मिळते. त्याचप्रमाणे भुईमुगाच्या शेंगा जमिनीत पोसत असल्याने भुईमुगाची लागवड रुंद गादीवाफा पद्धतीत (इक्रिसॅट पद्धत) करून प्लास्टिक/पॉलिथिन किंवा शेतातील काडीकचरा, पाचट इ. साहित्याने पिकास आच्छादन केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. भुईमूग पिकाच्या पाणी देण्यासाठीच्या तीन संवेदनक्षम अवस्था आहेत. त्या म्हणजे फांद्या फुटण्याची अवस्था, आ-या जमिनीत उतरण्याची अवस्था व शेंगा भरण्याची अवस्था. त्यासाठी भुईमुगाच्या पिकास पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी, ४० ते ५० दिवसांनी व ६५ ते ७० दिवसांनी पाणी द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .