“रब्बी पिकांच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन”
रब्बी बागायती पिकांपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पिकास पाण्याच्या उपलब्धतेनुसार तसेच पिकाच्या गरजेनुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे असते. भरपूर पाणी उपलब्ध असले तरी पिकास वारेमाप पाणी देणेही हितावह नसते कारण गरजेपेक्षा जास्त दिलेल्या पाण्यामुळे पिकाबरोबरच जमिनीवरही अनिष्ट परिणाम होतो. त्याकरिता जमिनीच्या प्रकारानुसार व पिकाच्या गरजेनुसार पाण्याच्या प्रत्येक पाळीत योग्य मात्रेत तसेच पिकांच्या संवेदनक्षम अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते.
गव्हासाठी पाणी व्यवस्थापनः
गव्हाच्या पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक पाळीत ८ ते १० सेंटिमीटर अशा तऱ्हेने एकूण ५ ते ६ पाळयांतून विभागून द्यावे. पहिले ओलवणीचे पाणी सोडून नंतरचे ४ किंवा ५ पाणी पिकाच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेत द्यावे. पहिले पाणी मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी, दुसरे पाणी फुटवे फुटण्याचे अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी, तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी व चवथे पाणी दाणे चिकात असताना म्हणजे पेरणीनंतर ८२ ते ८५ दिवसांनी द्यावे. याव्यतिरिक्त अजून एक जास्तीचे पाणी द्यावयाची व्यवस्था असेल तर ते पाणी पीक फुलोऱ्यात असताना ते दाणे चिकात असण्याच्या दरम्यान म्हणजे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी द्यावे.
हरभऱ्यासाठी पाणी व्यवस्थापनः
हरभरा पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण २५ ते ३० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हरभरा पिकाची पाण्याची ही गरज एकूण २ पाण्याच्या पाळयातून भागवावी. त्यासाठी पहिले पाणी पिकास फांद्या फुटताना म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि दुसरे पाणी घाटे भरताना म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. असे असले तरी हरभऱ्याच्या काही जाती विशेषतः विजय ही जात दिलेल्या पाण्याला अतिशय उत्तम प्रतिसाद देते. या जातीचे कोरडवाहू क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळते आणि बागायती म्हणून हे पीक घेतल्यास व त्याला ४ ते ५ पाण्याच्या पाळयात दिल्या तर विजय या जातीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते. जास्तीच्या या २ ते ३ पाण्याच्या पाळ्या फुलोऱ्याच्या कालावधीत दिल्या तर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो, जास्त फुले लागतात, घाटयाची संख्या वाढते पर्यायाने भरघोस उत्पादन मिळते. हरभरा पिकास जास्त प्रमाणात दिलेले पाणी सहन होत नसल्याने हरभऱ्याची लागवड सरी-वरंबा पद्धतीत टोकण पद्धतीने केल्यास आणि पिकास पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन मिळते. मात्र हरभऱ्याचा फुलोरा घुवून जाऊ नये म्हणून फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकास सरी-वरंबा पद्धतीने पाट पाणी द्यावे.
रब्बी ज्वारीसाठी पाणीव्यवस्थापनः
रब्बी ज्वारीची एकूण पाण्याची गरज ४० सेंटीमीटर एवढी असते. हे पाणी रब्बी ज्वारीस एकूण तीन पाण्याच्या पाळयांमधून समान विभागून द्यावी. पहिले पाणी पीक गर्भावस्थेत असताना म्हणजे पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि तिसरे पाणी कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. सूर्यफुलासाठी पाणी व्यवस्थापनः
सूर्यफुलाचे पीक वर्षातील तिनही हंगामात घेतले जात असले तरी रब्बी हंगामात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन केले तर इतर दोन हंगामापेक्षा या पिकाचे रब्बी हंगामात जास्तीत जास्त उत्पादन मिळते. सूर्यफूल पिकास रब्बी हंगामात एकूण चार पाण्याच्या पाळया पीक रोपावस्थेत असताना म्हणजे पेरणीनंतर १६ ते २० दिवसांनी फुलकळ्या लागण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी, पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी व दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी द्याव्यात. सूर्यफुलाची रब्बी हंगामातील एकूण पाण्याची गरज ४० ते ५५ सेंटीमीटर एवढी असते.
मोहरीसाठी पाणी व्यवस्थापनः
मोहरीच्या पिकास लागणारे एकूण १८ ते २० सेंटीमीटर पाणी ३ पाण्याच्या पाळयांमधून समप्रमाणात विभागून द्यावे. पहिले पाणी पेरणीच्या वेळी, दुसरे पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी व तिसरे पाणी पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी द्यावे. दिलेल्या पाण्याचा उपयोग पिकास जास्तीत जास्त फांद्या फुटण्यास तसेच पिकास भरपूर फुलोरा येण्यासाठी होतो.
करडईसाठी पाणी व्यवस्थापनः
महाराष्ट्रात करडईचे पीक बहुतांशी कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते कारण या पिकाची मुळे जवळपास १ मीटर खोलवर जाऊन जमिनीच्या खालच्या थरातील पाणी सहजरित्या शोषून घेऊ शकते. असे असले तरी बागायती म्हणून घेतलेल्या करडई पिकास २५ ते ३० सेंटीमीटर पाणी २ किंवा ३ पाळयांतून विभागून द्यावे. पहिले पाणी पिकाच्या लुसलुशीत अवस्थेत, दुसरे पाणी फांद्या फुटताना व तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .