“रब्बी हंगामात फळझाडांसाठी पाणी व्यवस्थापन”
बहुतांश फळझाडे ही बहुवर्षीय असल्याने त्यांच्या योग्य वाढीसाठी तसेच त्यांच्यापासून भरघोस उत्पादन मिळविण्याकरता वर्षभर जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. खरीप हंगाम हा पावसाळ्यात येत असल्याने जर पाऊसमान चांगले असेल तर फळझाडांसाठी पाणी व्यवस्थापनासाठी फारसे काही करावे लागत नाही. मात्र खरिपात पडलेल्या पावसाचा ओलावा रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या काळात फळझाडांना उपयोगी पडत असला तरी उर्वरित रब्बी हंगामात फळझाडांसाठी योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आंबा, द्राक्ष, डाळिंब ही फळे उन्हाळी हंगामात काढणीस येत असल्याने त्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी तसेच उच्च प्रतीसाठी पीक व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या घटकांबरोबर पाणी व्यवस्थापन या महत्त्वाच्या घटकाकडे रब्बी हंगामातच पुरेशे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
पेरू, डाळिंब, बोर, मोसंबी या फळझाडांना पानगळ होऊन विश्रांती देण्यासाठी व एकाच हंगामात बाहेर येण्यासाठी बहार धरण्यापूर्वी सुमारे दोन महिने अगोदर पाणी तोडून ताण द्यावा लागतो. सर्व फळझाडांमध्ये सुरुवातीच्या तीन ते चार वर्षाच्या काळात विशेषतः फुलधारणा तसेच फळवाढीच्या काळात जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असणे गरजेचे असते. फळ झाडांसाठी पाण्याच्या पाळया ठरवताना जमिनीतील उपलब्ध पाण्याची पातळी पिकाच्या प्रकारानुसार ३५ टक्यांपेक्षा खाली जाणार नाही व पिकांच्या वाढीच्या नाजूक अवस्था या दोन बाबी विचारात घ्याव्या लागतात.
द्राक्ष पिकास ऑक्टोबर छाटणीनंतर पाणी दिल्यानंतर २० ते २५ दिवस पाणी देऊ नये. फळधारणेपूर्वी मुबलक पाणी दिल्याने वांझ फूट होते व फळधारणा कमी होते. त्यामुळे फुल आणि फळधारणेच्या काळात वेलींना जास्त प्रमाणात पाणी देण्याचे टाळावे. मात्र फळधारणेपासून फळ तयार होईपर्यंत वेलींना पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात वेलींना योग्य मात्रेत ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. द्राक्षाचे मनी पक्व होण्याच्या काळात वेलीला पाणी देण्याचे थांबवावे. या काळातही जास्त प्रमाणात पाणी दिले तर मणी कुजतात किंवा तडकतात. पर्यायाने द्राक्षाच्या प्रतीवर विपरीत परिणाम होतो.
डाळींबाच्या पिकास पाण्याच्या उपलब्धतेनुसार फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून फळे झाडावर असताना व ती काढेपर्यंत रब्बी हंगामात १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित पाणीपुरवठा करावा. पाणी देण्यात अनियमितपणा झाल्यास फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. फळांच्या वाढीच्या काळात ताण पडून नंतर भरपूर पाणी दिल्यास त्यांना तडे पडतात व फळे गळतात. फळे पक्व होण्याच्या
काळात पाण्याचे प्रमाण कमी करावे व फळांची संपूर्ण तोडणी झाल्यानंतर पाणी तोडावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .