“रब्बी भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन”
भाजीपाला पिकास गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्याने त्यांच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकासाठी फार हलकी किंवा अतिशय भारी, पाण्याचा निचरा न होणारी जमीन निवडू नये. भाजीपाला पिके सहसा बागायती म्हणून घेतली जात असल्याने पिकास पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणी करणेही गरजेचे असते अन्यथा पिकास योग्य प्रमाणात सर्व ठिकाणी सारखे पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ समप्रमाणात होत नाही व त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी रुंद गादी वाफा पद्धत अतिशय उपयुक्त आहे तसेच भाजीपाल्याच्या प्रकारानुसार वाफे पद्धत (पालेभाज्या कांदा लसूण इ.), सरी-वरंबा पद्धत (वांगे टोमॅटो मिरची इ.) व आळे पद्धत (वेलवर्गीय भाजीपाला) या रानबांधणीच्या पद्धतींचा अवलंब करावा. भाजीपाला पिके पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असल्याने जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत व योग्य अंतराने भाजीपाला पिकांना पाणी देणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत ४ ते ६ सें.मी., मध्यम जमिनीत ६ ते ८ सें.मी. व भारी जमिनीत ८ ते १० सें.मी. उंचीचे पाणी भाजीपाला पिकास द्यावे. हलक्या जमिनीत कमी अंतराने तर भारी जमिनीत जास्त दिवसांच्या अंतराने भाजीपाला पिकास पाणी द्यावे. त्यानुसार रब्बी हंगामात हलक्या जमिनीत ८ ते १० दिवसाच्या अंतराने, मध्यम जमिनीत १२ ते १४ दिवसाच्या अंतराने आणि भारी जमिनीत १८ ते २० दिवसाच्या अंतराने भाजीपाला पिकास पाणी द्यावे.
भाजीपाला पिके नगदी पिके असल्याने या पिकांसाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतींचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या निश्चितच परवडणारे असते. आधुनिक सिंचनाच्या वापराने उपलब्ध पाण्यात भाजीपाल्याचे जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येते तसेच पाहिजे तेंव्हा योग्य त्या प्रमाणात पिकास पाणी देता येत असल्याने पिकाची वाढ जोरदार होते, कीड व रोगासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते, भाजीपाल्याची प्रत चांगली मिळते व त्यामुळे चांगला बाजारभावही मिळतो.
जास्त अंतरावरील भाज्यांकरिता ठिबक सिंचन पद्धत तर कमी अंतरावरील व कमी उंचीच्या भाजीपाल्याकरिता सूक्ष्म फवारा सिंचन
(मायक्रोस्प्रिंकलर)
किंवा कांदा व लसूण पिकांसाठी फवारा सिंचन पद्धत (स्प्रिंकलर) उपयुक्त आहे. आधुनिक सिंचन पद्धतींसाठी सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असल्याने या पद्धती भाजीपाला पिकांसाठी वापरताना, विशेषतः ठिबक सिंचन पद्धतीत पिकांच्या प्रचलित लागवड पद्धतीत बदल करून जोडओळ पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने भाजीपाला पिकांसाठी (उदा. टोमॅटो, वांगी, कोबी, कांदा, लसूण, काकडी, दोडकी, बटाटा, मिरची, टरबूज, वाल, भेंडी, इ.) ठिबक व तुषार सिंचन पद्धतींच्या वापराविषयी विपुल संशोधन करून त्याचे निष्कर्ष उपलब्ध करून दिले आहेत. या संशोधनातून असे आढळून आले आहे की भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्यात २२.९० ते ५९.७० टक्के बचत होऊन उत्पादनात ४.९० ते ४०.९० टक्क्यांपर्यंत वाढ झाली तसेच तुषार सिंचन पद्धतीचा उन्हाळी कांद्यासाठी वापर केल्याने पाण्यात ३३.३० टक्के बचत होऊन कांदा उत्पादनात सुमारे २३ टक्के वाढ झाली. एकूणच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीच्या वापराने पाण्यात बचत होते, पर्यायाने जास्त भाजीपाल्याचे क्षेत्र लागवडीखाली आणता येते, त्याचप्रमाणे भाजीपाल्याच्या हेक्टरी उत्पादनातही वाढ होते. पाण्याची बचत अपेक्षेप्रमाणे व्हावी यासाठी ठिबक किंवा तुषार संच विशिष्ट काळ चालवावा लागतो. पिकाची पाण्याची गरज संपूर्णतः हवामानावर अवलंबून असते आणि रब्बी हंगामात घेतलेल्या भाजीपाला पिकाची सुरुवातीची वाढ, फुलोरा व फळे लागण्याचा काळ हा हिवाळी हंगामात येत असल्याने खरीप व उन्हाळी हंगामाच्या तुलनेत पिकाची पाण्याची गरज कमी असते. त्यामुळे तुषार सिंचन पद्धतीत प्रचलित पद्धतीत जेवढ्या दिवसाच्या अंतराने पाणी देतो तेवढ्याच दिवसाच्या अंतराने गरजेचे एवढे पाणी द्यावे व ठिबक पद्धतीने दररोज किंवा एक दिवसाआड आवश्यक मात्रेत पाणी द्यावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत