फळझाडे ही बहुवार्षिक असल्याने त्यांच्या वाढीचा काही काळ उन्हाळी हंगामात येणे क्रमप्राप्तच आहे. याउलट उन्हाळी हंगामातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळ लागवडीचे नियोजन केले जाते. मात्र काही वेळा अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाणी उन्हाळी हंगामात फळझाडांसाठी उपलब्ध होते, अशावेळी फळझाडांना किमान वाचवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
आंब्याची झाडे मोठी झाल्यानंतर विशेष असे पाणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामात करावे लागत नसले तरी लिंबूवर्गीय फळझाडे, पपई, केळी, द्राक्षे यांना योग्य मात्रेत जमिनीच्या प्रकारानुसार विशिष्ट अंतराने दुहेरी आळे अथवा वाफे किंवा रुंद वरंबा पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे कोरडवाहू म्हणून ओळखली जाणारी बोर, सीताफळ, आवळा, डाळिंब (बहार धरला नसला तर) ही फळझाडे उन्हाळी हंगामात सुप्तावस्थेत जातात आणि या काळात त्यांची पाण्याची गरज अतिशय कमी होते. तरीही अशा फळझाडांसाठी जमिनीत काही प्रमाणात ओलावा असणे आवश्यक असते. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की फळझाडांना अशा प्रकारे पाणी दिले पाहिजे की दिलेल्या पाण्यापैकी जास्तीत जास्त ६५ टक्के पाणी जमिनीतून उडून गेल्यानंतर अथवा पिकाने शोषून घेतल्यानंतर पिकाला लगेचच दुसरे पाणी दिले गेले पाहिजे. उन्हाळी हंगामात पिकांना केवळ वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेत झाडांना सावली करणे, दुहेरी आळे पद्धतीने फळझाडांना पाणी देणे, फळझाडांच्या खोडांना चुनामिश्रित जस्त लावणे, पानांची संख्या कमी करणे, आच्छादनाचा वापर करणे, बाष्परोधकांचा वापर करणे, मडका सिंचन पद्धत तसेच ठिबक, फवारा, रेनगन या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे, इत्यादींचा समावेश होतो. या सर्व पद्धतीत फळझाडांची पाण्याची गरज उन्हाळी हंगामात कमीत कमी ठेवता येते व नंतर जे काही पाणी उपलब्ध असेल त्या पाण्यात किमान उन्हाळी हंगामापुरती तरी फळझाडे जगवता येतात.
नवीन लागवड केलेली फळझाडे उष्णतेमुळे जळून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतातच असलेल्या टाकाऊ साहित्याच्या मदतीने अशा फळझाडांवर सावली तयार करावी, असे केल्याने त्यांचे काही प्रमाणात प्राण्यांपासूनही संरक्षण होऊ शकते. फळझाडांच्या जमिनीलगतच्या खोडाला पाण्याचा सततचा संपर्क येत गेल्यास बुरशीजन्य रोगात वाढ होते. त्याचप्रमाणे पाण्याचा काही प्रमाणात अपव्यही होतो. त्यासाठी सुमारे ३ वर्षापर्यंतच्या फळझाडांना मातीची भर द्यावी. त्याच्या बाजूने आळे तयार करावेत व या आळ्यातच पाणी सोडावे.
फळ झाडांसाठी आच्छादनः उन्हाळ्यात पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून फळझाडाच्या खोडाला झिंक सल्फेट, २ किलो + २० किलो चुना, ५०० लिटर पाण्यात चांगला एकजीव करून लावावा. फळझाडांमधून जमिनीतून शोषून घेतलेल्या पाण्याच्या ९८ टक्के पाणी वातावरणात सोडले जाते. या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडाच्या पानांची संख्या कमी करणे गरजेचे असते. त्यासाठी झाडाच्या सुमारे २५ टक्के फांद्या काढाव्यात. फळझाडांच्या शरीरामधून ज्याप्रमाणे वातावरणात पाणी जाते त्याचप्रमाणे प्रचंड उष्णतेमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरूनही पाण्याचे फार मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी शेतातील धसकटे, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा उसाच्या पाचटाचा किमान १५ सें.मी. उंचीचा थर आच्छादनाच्या स्वरूपात फळझाडांखाली टाकावा. या ठिकाणी हुमणी किंवा वाळवीचा उपद्रव होऊ नये म्हणून फॅालीडॉल पावडर, २ टक्के आच्छादनाच्या ठिकाणी मिसळावी. फळझाडाच्या पानाद्वारे होणारे बाष्पनिष्कासन कमी करण्यासाठी केओलीन, पांढरा खडू पावडर यासारख्या बाष्परोधकाचा वापर करावा. पाण्याच्या बचतीच्या दृष्टीने उन्हाळी हंगामात मडका सिंचन पद्धत, ठिबक सिंचन किंवा फवारा तसेच रेनगन सिंचन पद्धतीचा वापर करावा.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत