ठिबक सिंचन संच वापरताना त्यातील विविध घटकांची नियमित स्वच्छता केली गेली नाही तर त्यात काडीकचरा, घाण व इतर गोष्टीची साठवणूक होऊन तोटी पूर्णतः किंवा अंशतः बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता धातूची तसेच जाळीची गाळण टाकी नित्य नियमाने स्वच्छ करावी. अधून मधून उपनळयांची शेवटची तोंडे उघडून त्यातून जास्त दाबाने पाणी सोडावे. तोट्या काढून त्या सौम्य आम्ल द्रावणात रात्रभर ठेवून स्वच्छ धुवून काढाव्यात. संचात जास्त प्रमाणात घाण असल्यास आवश्यकतेप्रमाणे आम्ल व क्लोरीन प्रक्रिया करावी. पाणी पिकास योग्य दाबाने दिले जाते की नाही यासाठी दाब मापकाचा वापर करावा.
जास्त अंतरावरील (उदा. फळपिके) पिकांसाठी ठिबक सिंचन ही पद्धत निर्विवादपणे फायदेशीर आहे. कारण या पिकांसाठी लागणाऱ्या उपनळया व तोट्यांची हेक्टरी संख्या कमी लागते. मात्र मध्यम व कमी अंतरावरील पिकाच्या प्रत्येक ओळीस एक उपनळी टाकणे खर्चिक बाब ठरते. त्यासाठी कृषी विद्यापीठांनी, वाल्मीसारख्या संस्थांनी आणि इतर शासकीय संस्थांनी संशोधन करून ठिबक पद्धतीसाठी निरनिराळ्या पिकांच्या जोडओळ पद्धती विकसित केल्या आहेत. प्रचलित अंतर थोडेसे कमी करून पिकांच्या दोन ओळीसाठी एकच उपनळी वापरणे जोडओळ पद्धतीने शक्य झाले आहे. जोडओळ पद्धतीच्या वापराने ठिबकच्या उपनळया व तोट्यांवरील खर्चात सरसकटपणे ५० टक्के बचत होत असल्याने ऊस, कापूस, विविध भाजीपाला पिके, केळी, इत्यादी पिकांसाठी जोडओळ पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.
पाणी व्यवस्थापनः पिकांच्या रोजच्या अथवा एक दिवसाआडच्या गरजेनुसार मुळाच्या कक्षेत विशिष्ट (ठराविक) मात्रेत पिकास रोज किंवा दिवसाआड पाणी द्यावे ही मुळात ठिबक सिंचन पद्धतीची संकल्पना आहे. पिकाची पाण्याची रोजची गरज ही बाष्पीभवन व पिकांचे वय यावरून ठरवली जाते तसेच या पद्धतीवर घेतलेल्या पिकाखालील जमीन नेहमी वाफसा परिस्थितीत असावी हा ही दृष्टिकोन असतो. नेहमी वापसा परिस्थिती ठेवल्यास पिकास पाण्याची उपलब्धता कायम होत असल्याने पिकाची वाढ जोमदारपणे होते व पर्यायाने पिकापासून भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. मात्र शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचन पद्धतीवर घेतलेल्या पिकास योग्य त्या मात्रेत पाणी दिले जातेच असे नाही. यात कुठल्या पिकास कोणत्या हंगामात नेमके किती पाणी द्यावे याबाबतची तंत्रशुद्ध माहिती नसणे तसेच रोज अथवा एका दिवसात पाणी देण्यात काही कारणांमुळे (विशेषतः१ विद्युत पुरवठ्यातील अनियमितपणा) याचा समावेश होतो. परिणामी या पद्धतीचा वापर करूनही प्रचलित पद्धतीने पाणी दिल्यासारखे जास्त दिवसाच्या अंतराने मोठ्या प्रमाणात पिकास पाणी दिले जाते. दुसऱ्यावेळी पाणी देईपर्यंत पिकाच्या क्षेत्रात कोरडेपणा निर्माण होऊन त्या परिसरातील पाण्याच्या शोधात असलेली कुत्री, डुकरे, इत्यादी प्राण्यांकडून उपनळयांची नासधूस होण्याची शक्यता असते तसेच कित्येकदा पावसाळी हंगामात ठिबक सिंचन संचाच्या उपनळया गुंडाळून ठेवण्याकडे कल असतो. त्यामागे पावसाळी हंगामात नक्कीच पाऊस पडेल तसेच या हंगामात पिकाची पाण्याची गरज इतर हंगामाच्या तुलनेत कमी असते ही भावना असते. मात्र प्रत्यक्षात पावसाळी हंगामातही पावसात मोठा खंड पडू शकतो आणि हिवाळी हंगामाच्या तुलनेत पावसाळी हंगामात पिकाची पाण्याची गरज निश्चितच जास्त असते. म्हणून हंगाम कुठलाही असला तरी ठिबक सिंचन पद्धतीत पिकाची पाण्याची रोजची गरज भागवली गेली पाहिजे. अर्थात ही गरज पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या स्वरूपात भागवली जात असते. केवळ तेवढ्याच विशिष्ट काळात ठिबक सिंचनाचा वापर थांबविणे संयुक्तिक ठरते. इतर हंगामात पिकाची पाण्याची गरज नेमकी किती असते याबाबतची माहिती कृषी विद्यापीठांकडून उपलब्ध होऊ शकते. या माहितीचा वापर शेतकऱ्यांनी जरूर करावा.
खत व्यवस्थापनः पाश्चात देशात ठिबक सिंचन पद्धतीतून पिकास ज्या ज्या वेळी पाणी दिले जाते त्यावेळी खताची मात्रा दिली जावी अशी संकल्पना आहे. आपल्याकडे विविध कारणांमुळे ते शक्य होत नसले तरी खताच्या मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार जास्तीत जास्त देणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचातून प्रत्यक्षात खते देण्यापूर्वी पिकाची पाण्याची त्या दिवशीची गरज भागवण्यासाठी चालवाव्या लागणाऱ्या संचाच्या एकूण वेळेपैकी २५ टक्के वेळेचे पाणी पिकास द्यावे. त्यानंतर सुमारे ५० टक्के काळात खताची मात्रा पाण्याबरोबर द्यावी व शेवटी उर्वरित २५ टक्के काळाचे पाणी खत दिल्यानंतर पुन्हा पिकास द्यावे. यामागे उद्देश असा आहे की ठिबक सिंचनातून दिलेले खत पिकाच्या मुळाच्या कक्षेत दिले जावे व पिकांकडून त्याचा कार्यक्षम वापर केला जावा. त्याचप्रमाणे शेवटी दिलेल्या पाण्यामुळे संचातील विविध घटकात अडकलेले खताचे सूक्ष्म कण तोटीद्वारे बाहेर टाकले जावेत की जेणेकरून त्यांचा साका तयार होणार नाही व त्यामुळे तोट्या बंद पडणार नाहीत.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .