महाराष्ट्रातील शेतक-यांना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर नवीन नाही. कुठलेही प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतावर वापर करण्यात येतील शेतकरी देशाच्या इतर भागांच्या तुलनेत निश्चितच आघाडीवर असतात. असे असले तरी सर्वच शेतकऱ्यांकडून या पद्धतीचा वापर योग्य प्रकारे होतो आहे असे म्हणता येणार नाही. एक तर ही पद्धत वापरण्यासाठी खूप मोठ्या तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते हा समज आणि दुसरीकडे ही पद्धत वापरताना छोट्या छोट्या बाबींविषयी पथ्य पाळण्याचा अभाव, परिणामी या पद्धतीत पाणी वापराची तसेच किमान ५-६ वर्ष सलगपणे सेवा देण्याची पुरेपूर क्षमता असतानाही केवळ अज्ञानामुळे या पद्धतीला दोष दिला जाऊन थोड्या वापरानंतर ही पद्धत अनेक ठिकाणी अक्षरशः गुंडाळून ठेवलेली दिसून येते. मुळात ही पद्धत वापरताना काही बाबतीत जागरुकता दाखवली, काही पथ्य पाळली, किमान तांत्रिक ज्ञान अवगत केले तर या पद्धतीपासून निश्चितच जास्तीत जास्त फायदा होतो.
ठिबकची उपयुक्तताः ठिबक सिंचन पद्धत नेमक्या कुठल्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे हे शेतकऱ्यांना एव्हाना
चांगले कळले आहे. एवढी मोठी भांडवली गुंतवणूक केल्यानंतर अर्थातच या पद्धतीवर नगदी, जास्त फायदा देणारी पिके घेतली पाहिजेत. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीत ज्या पिकांना (उदा. ऊस) कळत नकळत किंवा जाणून बुजून मोठ्या प्रमाणात पाणी दिले जाते अशा पिकांसाठी ही पद्धत वापरणे अनिवार्य ठरते. थोडक्यात ३ फुटांपुढील अंतरावरील व शेतात जास्त काळ राहणाऱ्या पिकांसाठी ही पद्धत खूपच फायदेशीर ठरते. या पद्धतीत पाण्याची जवळपास ५० टक्के बचत होते हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. मात्र आपण या पद्धतीवर घेणाऱ्या पिकांना त्यांच्या संपूर्ण कालावधीत विशेषतः उन्हाळी हंगामात उपलब्ध पाणी पुरणार आहे का याचा अंदाज घेऊनच ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा नाहीतर अनेक वेळा ठिबक सिंचनासाठी पाणी शिल्लक राहत नाही व अर्थातच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ठिबकचा आराखडाः जमिनीच्या प्रकारानुसार, उतारानुसार व पिकातील अंतरानुसार ठिबक सिंचन पद्धतीची योग्य प्रकारे शेतात मांडणी होणे अतिशय महत्त्वाचे असते कारण यात सुरुवातीलाच काही त्रुटी राहिल्या तर त्यात नंतर सुधारणा करणे अवघड असते. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या आराखड्याबाबत तसेच या पद्धतीच्या आवश्यक घटकांबाबत शेतकऱ्यांनी आग्रही असावे लागते. ही पद्धत किमान ५ ते ६ वर्षे शेतात राहणार असल्याने दरम्यानच्या काळात पिकांच्या प्रकारानुसार, हंगामाप्रमाणे ठिबक बसविलेल्या शेतात अगदी ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही मशागत करता यावी याकरता ठिबक पद्धतीच्या मुख्य व उपमुख्य नळ्या जमिनीत पुरेशा खोलवर गाडल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून केवळ उपनळया (लॅटरल) एका जागी गुंडाळून ठेवल्या तर उर्वरित पिकाच्या क्षेत्रात आवश्यक ती मशागत सहजासहजी करता येते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .