“पिकाला मोकाट पद्धतीने पाणी देण्याचे टाळावे”
उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या पिकांसाठी त्याच्या संपूर्ण कालावधीत पाण्याच्या उपलब्धतेबाबत खात्री असल्यास त्या पिकांसाठी उपलब्ध पाणी जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरण्यासाठी प्रयत्न करावेत. कुठल्याही परिस्थितीत पिकाला मोकाट पद्धतीने पाणी देण्याचे टाळावे. कारण पिकास पाणी देण्याची ही पद्धत अशास्त्रीय अशी असून या पद्धतीत पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्याचप्रमाणे प्रवाही पद्धतीतही पिकास पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणीचा वापर केला तर मोकाट पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत योग्य रानबांधणीत घेतलेल्या पिकाचे क्षेत्र उपलब्ध पाण्यात किमान दीडपट ते दुप्पट प्रमाणात वाढविता येते.
उन्हाळी हंगामातील विविध पिकांसाठी निरनिराळ्या रानबांधणीच्या प्रकारात भुईमुगासाठी रुंद गादी वाफा किंवा सारे पद्धत, भाजीपाल्याच्या सर्व पिकांसाठी तसेच मका, ज्वारी किंवा बाजरी या चारा पिकांसाठी सरी-वरंबा पद्धत, टरबूज-खरबूज या फळ पिकांसाठी सरीमध्ये जोड ओळ पद्धत, इत्यादीचा वापर करावा.
प्रवाही सिंचन पद्धतीत सारे, सरी-वरंबा किंवा रुंद गादी वाफ्याची रुंदी व लांबी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठेवणे गरजेचे असते. हलक्या जमिनीत लांबी व रुंदी कमी, मध्यम जमिनीत मध्यम व काळया कसदार भारी जमिनीत तुलनेने जास्त ठेवावी लागते. अर्थातच यासाठी जमिनीचा उतारही लक्षात घ्यावा लागतो.
उन्हाळी हंगामात जमिनीच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत असते. त्याचप्रमाणे वातावरण उष्ण असल्यामुळे पिकाच्या शरीरातून पानांच्याद्वारेही फार मोठ्या प्रमाणात पर्णोत्सर्जन होत असते. पिकाची पाण्याची गरज बहुतांशी या दोन बाबींवर अवलंबून असते. त्यामुळेच उन्हाळी हंगामात पिकाची पाण्याची गरज जास्त असल्याने हे पाणी कमी अंतराने मात्र जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत द्यावे लागते. अन्यथा अनाठाई पाण्याचा अपव्यय होतो.
हलक्या मुरमाड जमिनीत पाण्याच्या प्रत्येक पाळीत ४ ते ६ सें.मी., मध्यम जमिनीत ६ ते ८ सें.मी. व भारी जमिनीत ८ ते १० सें.मी. पाणी उन्हाळी पिकांना गरजेनुसार ८ ते १० दिवसाच्या अंतराने द्यावे.
प्रवाही पद्धतीत उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन वरील प्रमाणे करावे. त्याचप्रमाणे पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक, तुषार व रेनगन सिंचन पद्धतींचाही उन्हाळी पिकांसाठी शेतकरी बांधवांनी वापर करावा. जास्त अंतरावरच्या व जास्त उंचीच्या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त आहे. ठिबक सिंचन पद्धतीतून दररोज किंवा एक दिवसाआड पिकास पाणी द्यावे. कमी अंतरावरची व कमी उंचीची पिके तुषार सिंचन पद्धतीवर अतिशय चांगले उत्पादन देतात. तुषार सिंचन पध्दतीचा खर्चही कमी येतो. रेनगन पद्धत ही अत्याधुनिक अशी पद्धत असून केवळ एका रेनगन तोटीतून तिच्या प्रकारानुसार अर्धा ते अडीच एकर क्षेत्र भिजवले जाते. अशा पद्धतीने प्रवाही तसेच आधुनिक सिंचन पद्धतीत शेतकऱ्यांनी व्यवस्थापनाद्वारे उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करावा.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत.