“पेरणीच्या वेळेनुसार गव्हाचे सुधारित वाण, पेरणीची योग्य वेळ,

credit : pexels-soly-moses

“पेरणीच्या वेळेनुसार गव्हाचे सुधारित वाण, पेरणीची योग्य वेळ, हेक्टरी बियाणे आणि करावयाची बीजप्रक्रिया”


महाराष्ट्रात विविध कारणांमुळे गव्हाची निरनिराळ्यावेळी शेतकरी बांधव लागवड करीत असतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने पेरणीच्या वेळेनुसार गव्हाचे वाण विकसित केले आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात जिरायत गव्हाची लागवड केली जाते अर्थातच ही लागवड अत्यल्प आहे.जिरायत पेरणीसाठी एनआय डीडब्ल्यू- १५ (पंचवटी) व एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे. गव्हाची जिरायत पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करता येते. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा होय. एन आयएडब्ल्यू – ३०१ (त्रिंबक), एनआयए डब्ल्यू- ९१७(तपोवन) व एमएसीएस – ६२२२ हे सरबती वाण व एन आयडीडब्ल्यू- २९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेनुसार पेरणीसाठी शिफारस केलेला आहे .सोयाबीन आणि भात पिकानतंर मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड डिसेंबर महिन्याच्या पहिल्या -दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. उशिरा पेरणी करावयाची झाल्यास आणि किमान २ ते ३ पाण्याच्या पाळ्या देण्याची सुविधा असल्यास निफाड -३४ हा वाण शिफारस करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य असलेला एकमेव वाण म्हणजे एनआयए डब्ल्यू-१९९४ (फुले समाधान). याव्यतिरिक्त संरक्षित पाण्याखाली (एखादे- दुसरे पाणी) घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर दरम्यान करण्याची शिफारस असून अशा परिस्थितीत लागवड करण्यासाठी एनआयएडब्ल्यू- १४१५ (नेत्रावती) व एचडी -२९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची शिफारस आहे.
बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.
गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे तर संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणास थायरम ७५% डब्ल्यूएस या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झामची ३०% एफएस ७.५ मिली. प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीज प्रक्रियेमुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे १० ते १५ टक्के वाढ होते.

लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *