४४ दिवस १७ तासांत पूर्ण केले ४ हजार ११२ कि.मी. अंतर
नाशिक : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचा माजी विद्यार्थी आणि निफाड तालुक्यातील तामसवाडीतील शेतकऱ्याच्या मुलाने अवघ्या ४४ दिवसांत काश्मिर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर धावत पूर्ण केले. त्याने दि. ११ नोव्हेंबरला सुरु केलेली ही मोहीम २६ डिसेंबर रोजी फत्ते करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली असून, यानिमित्ताने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर तर झळकलेच शिवाय मविप्रच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.
वैभव वाल्मिक शिंदे (वय २६) असे या युवकाचे नाव असून, निफाड तालुक्यातील तामसवाडी हे त्याचे छोटेसे गाव. आई आशाबाई, वडील वाल्मिक आणि लहान भाऊ विकास असे हे छोटे शेतकरी कुटुंब. वैभवचे प्राथमिक शिक्षण तामसवाडीतील मविप्र समाजाच्या जनता विद्यालयात तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मविप्रच्याच मांजरगाव येथील जनता विद्यालयात झाले. शाळा-महाविद्यालयातदेखील विविध स्पर्धांमध्ये वैभवने यश मिळविले आहे. परंतु धावण्याच्या स्पर्धेतच दुखापत झाल्याने मध्ये काही काळासाठी त्याचे धावणे थांबले होते. परंतु त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच त्याची दिल्लीमध्ये सुफिया खान या प्रशिक्षकाबरोबर भेट झाली. त्यांनी महाराष्ट्रातून अद्याप असा विक्रम कोणी केलेला नाही, असे सांगताच वैभवने ‘तो’ विक्रम करण्याची खुणगाठ बांधली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला.
असा केला सराव
डिसेंबर २०२१ पासून नाशिकमधील सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज २ ते ३ तास सराव सुरु केला. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातून वैभवने या मोहिमेला सुरुवात केली. कडाक्याची थंडी, ऊन वारा याची तमा न बाळगता रात्र आणि दिवस धावत वैभवने अवघ्या ४४ दिवस १७ तास आणि १५ मिनिटे इतक्या विक्रमी कमी वेळेत काश्मिर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर पूर्ण करून ‘सोल रन’मध्ये इतिहास रचला. वैभवच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे. वैभवला यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तामसवाडीचे गुरुदेव कांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.