“घर तेथे चिमणी घर” – सुशांत घोडके यांचे आवाहन
कोपरगांव/शिर्डी : धावत्या जगाचे निसर्गावर विपरीत परिणाम होत आहेत . वाढते शहरी उद्योगिकरणामुळे वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून त्याचा विपरीत परिणाम जीवसृष्टीवर होत आहे.
निसर्गावर अवलंबून असलेल्या पशू, पक्षी, झाडे वेली यांचे जगणे असह्य होत आहे. अशा परिस्थितीत जीवसृष्टीतील महत्वाचा घटक चिमणी जगवुन संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी “घर तेथे चिमणी घर” यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांनी केले आहे.
जागतिक चिमणी दिवस निमित्ताने सुशांत घोडके व पक्षीप्रेमी दिपक ठाणेकर (दिंडोरी) यांनी “घर तेथे चिमणी घर” अभियान सुरु केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही चिमणी घरांचे वितरणही केले आहे.
आज जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे.
जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे.
जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे. अशा पर्यावरण हिताच्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पक्षीप्रेमी दिपक ठाणेकर, सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके ,सूर्यतेज संस्था, हरितसेना सदस्य यांनी केले आहे.