भक्ताभिमुख व्हा ,पारदर्शकता जपा
साईबाबा संस्थान तुमची खाजगी संपत्ती नाही.
साईबाबा संस्थान ,शिर्डी हे धार्मिक स्थान जगभरातील भाविकांचे माहेरघर आहे . इथे कोट्यवधी भाविकांची आस्था जुडलेली आहे . इथे येणारे दान हे समाज व भक्ताभिमुख उपयोगात आणणे अपेक्षित आहे. केवळ तोडफोड करून आपली हौस भागविण्यासाठी इथे सनदी अधिकारी येतात कि काय असा प्रश्न आता भाविकांना पडू लागला आहे. सत्ताधारी मंत्री,संत्री यांच्यासाठी किमान उच्च न्यायालयाच्या समितीने पायघड्या घालू नये.या समितीला सामान्य भक्तही तितकाच महत्वाचा असावा.पण इथे नियुक्त सनदी अधिकारी यांनी लोकांना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे. बहुदा त्यांना “लोकसेवक “ या शब्दाचा विसर पडलेला आहे.
राज्यातले सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून साईबाबा मंदिर ,शिर्डी ची ओळख आहे . याठिकाणी भाविकांचा प्रचंड ओघ पाहता इथल्या अडीअडचणी त्वरेने सोडविण्यास मदत व्हावी ,या उद्द्येशाने इथे अनुभवी सनदी अधिकारी नेमावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर मा सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात तत्कालीन राज्य सरकारला मार्गदर्शन केले होते.परंतु याचा अवमान करणार नाही ते सरकार कसले याचाच प्रत्यय साईबाबा संस्थानला आला. त्यानुसार क्रियाशील सनदी अधिकारी नेमण्या ऐवजी मनमानी करणारे प्रमोटी तर कधी निष्क्रिय असलेले अशाची नाईलाजाने इथे नियुक्ती देऊन या नेमणूक राज्य सरकार करीत आहे. यातून प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी याना पगाराव्यतिरिक्त पंचवीस टक्के अतिरिक्त वेतन हे साईबाबांच्या तिजोरीतून दिले जात आहे. ते केवळ साई संस्थानचा कारभार सुरळीत व भक्ताभिमुख चालावा म्हणून. पण या मंडळीला सत्ताधाऱ्यापुढे पायघड्या टाकत,सामान्य भाविकाला वेठीस धरण्यात धन्यता वाटते. काही सनदी अधिकारी तर आपण संस्थानचे आजन्म मालक आहोत. अशा अविर्भावात इथली पारदर्शकता संपवायला निघाले होते. अर्थात ते प्रमोटी असल्याने आपली छाप पडायचा अयशस्वी प्रयोग त्यांनी केला. दुर्दैव हे कि , पुढे येणारे सनदी अधिकारी यांनी याबाबत विचारच केला नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मनमानीचा नवा प्रयोग सुरु केला.व भाविकांच्या पै पैचा विनियोग कसा केला जातो याची पारदर्शकताच संपविण्याचा सपाटा लावला आहे . असे दिसून येते.
आज पी शिवशंकर हे साईबाबा संस्थांनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त आहे.यांनी पदभार स्वीकारण्याआधी सामान्य भाविकांप्रमाणे दर्शन रांगेतून साई दर्शन घेतले. याच कौतुक झालं. पण खुर्चीत बसताच ते सत्ताधाऱ्यांच्या सेवेत दाखल झाले. त्यांनी सामान्य रांगेत आलेले अनुभवाला समजून घेतले असते तर साहेबाना भेटण्याची वेळ दुपारी ४ ते ५ हा फलक लावला नसता. या पूर्वीचे अधिकारी सर्वासाठी मंदिर उद्यापासून ते बंद होईपर्यंत उपलब्ध होते. तेही यांच्या इतकच काम करीत होते.आपल्या मनमर्जीने काम करता यावं त्याला कुणी पाहू नये त्यावर प्रश्न उपस्थित करू नये म्हणून मंदिर परिसरात पत्रकारांना नियम अटी शर्ती लागू केल्यास असल्याचे उघड होते.