आरोग्य विभागाचा गलथान कारभार…
कामचुकार, ढिसाळ यंत्रणेने बाळाची आई हिरावली .
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले अशोक राणू वाघ यांची मुलगी रेणुका गांगुर्डे हिला गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चासनळी येथील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती साठी नेण्यात आले.. सदर आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आणि सदर महिलेला अतिशय वेदना होत असल्याने तिथं उपस्थीत असलेल्या सिस्टरने मुलीच्या नातेवाईकांना तिला धामोरी येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यासाठी सांगितले परंतु सदर गरोदर महिलेला नेण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये पुरेशे डिझेल नसल्याचे कारण दिले गेले असल्याचे आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केले. त्यांनंतर एका खाजगी वाहनातून सदर महिलेला धामोरी येथे प्रसूतीसाठी नेण्यात आले. सदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव अतिप्रमाणात झाल्यामुळे सदर महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे तर बाळ सुखरूप आहे.
रुग्णालय आहे तर डॉक्टर नाही,,रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही,
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच याच आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका महिलेची प्रसूती ही रुग्णालयच्या गेटवर झाली होती त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी याच कारणाने ग्रामस्थांनी चक्क डॉक्टरांच्या रिकाम्या खुर्चीलाच पुष्पहार अर्पण केला होता, कोट्यावधी रुपये जर या आरोग्य केंद्रासाठी खर्च केले असून हीच परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसानी उपचारासाठी जायचे कुठे हाच प्रश्न नागरिकांपुढे आहे.
दरम्यान या रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी व या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी हीच मागणी आता मुलीच्या कुटुंबियांकडून होत आहे. डॉक्टर असते तर आमची मुलगी वाचली असती. या प्रकरणी चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या मयत महिलेच्या आईने केली आहे.तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप यांनी कारवाडी येथे भेट देऊन डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व कुटुंबीयांचा जबाब घेतला आहे. दरम्यान आज दोन डॉक्टर व रुग्णवाहिका चालक यांना निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे .