“रब्बी पिकांच्या पाणी व्यवस्थापन संबंधीच्या (आधुनिक सिंचन पद्धती) संशोधनाचे निष्कर्ष“
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन (आधुनिक सिंचन पध्दती)
संबंधितचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
चार ओळीनंतर एक ओळ रिकामी ठेवून उसाची लागण केल्यास व प्रत्येक दोन ओळीसाठी ठिबकची एक उपनळी वापरल्यास तसेच उसास द्रवरूप खते दिल्याने खतात २५ टक्के व पाण्यात ५६ टक्के बचत होऊन उत्पादनात २२ टक्के वाढ होते. जोड ओळ पद्धतीत (दोन ओळीनंतर एक ओळ
रिकामी सोडणे) लागण केलेल्या उसाच्या खताच्या मात्रेत २५ टक्के व पाण्यात ५६ टक्के बचत होऊन उसाच्या उत्पादनातही १८ टक्के वाढ होते.
केळी पिकाची लागवड जोडओळ पद्धतीत (०.९ – २.७० x १.५ मीटर) करून शिफारित खतांच्या ७५ टक्के मात्रा द्रवरूप खताद्वारे दिली असता खताच्या मात्रेत २५ टक्के व पाण्यात ४८ टक्के बचत होते तसेच प्रचलित पद्धतीच्या तुलनेत उत्पादनात १७ टक्के वाढही होते.
बायवॅाल ठिबक सिंचन पद्धतीवर घेतलेल्या कोबीच्या उत्पादनात प्रचलित पद्धतीच्या तुलनेत २१ टक्के वाढ व पाण्यात ६६ टक्के बचत होते.
वांगी पिकासाठी खताची शिफारस केलेली मात्रा द्रवरूप खताच्या स्वरूपात ठिबक सिंचनातून दिली असता पाण्यात ५२ टक्के बचत व उत्पादनात २९ टक्के वाढ झालेली दिसून आली.
लसूण पिकासाठी ठिबक सिंचनातून द्रवरूप खताचा वापर केल्यास खताच्या मात्रेत २५ टक्के व पाण्यात ५२ टक्के बचत होते.
भुईमूग पिकाची लागवड रुंद गादीवाफा पद्धतीने करून पिकास सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने दररोज पाणी दिले असता पाण्यात ४१ टक्के बचत होऊन उत्पादनात ३७ टक्के वाढ होते.
तुषार सिंचन पद्धतीच्या वापराने विविध पिकांच्या उत्पादनात सरासरी १० ते १५ टक्के वाढ होते तसेच पाण्यात २५ ते ३० टक्के बचत होते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .