रेलरोको साठी आलेल्या ग्रामस्थावर कार्यवाही झाली , पुणे डी आर एम वर कार्यवाही कोण करणार ?
डोळ्या समोरून दिवसभरात शंभर गाड्या धावतात , रेल्वेचा गावाला वेढा पडला,असे असून ग्रामस्थाना रेल्वे ने जाण्यासाठी नजीकच्या रेल्वे थांब्यावर जावे लागते. नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सर्व स्तरावर जावून आपली कैफियत पुणतांबा ग्रामस्थानी सातत्याने मांडली आहे. ” लोकसेवकाचे ” कर्तव्य विसरलेले रेल्वे प्रशासन नागरी सेवांचे व्यापारीकरण करून पैसा कमवू पाहत आहे. तर दुसरी बाजू रेल्वे प्रशासनाच्या मनमानीमुळे शेकडो कुटुंबाचे रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला. परिणामी गोरगरिबांच्या दळणवळणाच्या हक्कावर गदा आली आहे. गावातून रेल्वे जाणे ही गावच्या विकासाऐवजी मुळावर उठली आहे. असे म्हणण्याची वेळ पुणतांबेकरांवर आली आहे.
रेल्वेच्या आडमुठया कार्यपद्धतीने गावच्या पिण्याच्या पाण्याची मेन लाईन वारंवार तुटल्याने गावचा पाणीपुरवठा व्यवस्था मोडकळीस आली, अशा एक नाही तर अनेक अडचणीबाबत गावकऱ्यांनी आपला आवाज ” वर ” पर्यन्त पोहचविण्यासाठी ऐन स्वातंत्र्य दिनी रेल रोको केला. तेव्हा पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे यांनी ग्रामस्थांच्या समस्या निवारणाच्या दृष्टीने 21 औग रोजी आपल्या कार्यालय पुणे , येथे बैठक ठेवली होती. या बैठकीला गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थ उप सरपंच यांचे सह वीस ग्रामस्थ हे पदर मोड करून हजर होते. पण ज्यांनी बैठक बोलावली त्याच डी आर एम मॅडम परगावी गेल्या होत्या. विशेष म्हणजे त्या परगावी जाणार आहे. याची सूचना पुणतांबा ग्रामस्थान देणे गरजेचे मानले नाही. यावरून पुणे रेल्वे प्रशासन नागरिकांच्या सोय सुविधाबाबत किती संवेदनशील आहे याचा प्रत्यय येतो.
या बैठकीनंतर या प्रशासनाने ग्रामस्थांना पोलिस कार्यवाहीच्या नोटिस धडायला सुरुवात केली. आपल्या चुकांवर पांघरून घालन्यासाठी रेल्वे कायदाच्या आधारे आपला मूलभूत अधिकार मागण्यासाठी आंदोलन करणारे ग्रामस्थावर ही कार्यवाही लादली आहे. ग्रामस्थ याला सामोरे जाण्यास तयार आहेत. पण ग्रामस्थांच्या मागण्याच काय ? त्यांनी सतत केलेल्या पाठपुरावा व तक्रारीवर रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कोणत्या व्यवस्थेवर जबाबदारी निश्चित केली आहे. याबाबत ग्रामस्थ आता मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकला जाब विचारणार आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत अधिकारावर गदा अनू पाहणाऱ्या असंवेदनशील रेल्वे अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाहीसाठी ग्रामस्थ आग्रही आहे.
वीस दिवस आधी निवेदन ग्रामपंचयातीचा ठराव देवूनही पुणे विभागीय व्यवस्थापक इंदु दुबे यांच्या सर्व टीम ने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले.त्यांच्या कडून हे आंदोलन होवू नये यासाठी कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. पुणतांबा ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वतः या रेलरोकोला पाठिंबा दिला. परिणामी पाच हजार लोक यात सहभागी होवूनही हे आंदोलन शांततेत झाले. असे असतानाही रेल्वे प्रशासनाला त्यांच्या अधिकार हा सर्वतोपरी आहे. आपण जनतेचा आवाज दाबू शकतो यावर विश्वास आहे.याबाबत ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे.