त्रिसदस्य समितीचे साईबाबा संस्थान कारभाराकडे दुर्लक्ष !!!
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा शिर्डीत आले. त्यांनी जगाला आपल्या आचरणातून सर्वधर्म सदभावाची शिकवण दिली . त्यांनी तह हयात रुग्णांवर स्वत: उपचार केले. भुकेल्याना अन्न दिले. आजमितीला संस्थानात करोडो रुपयांची देणगी पडून आहे.इथे नतमस्तक होणारे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. भाविकांचे दु:ख निवारण होते.देश विदेशातील भाविक बाबांच्या झोळीत भरभरून देणगी देतात. अशा साईबाबा संस्थानचा कारभार आज न्यायालयाच्या त्री सदस्य समितीकडे आहे. यात जिल्हाधिकारी ,प्रधान न्यायाधीश ,साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे आहेत. या प्रत्येकाकडे आपल्या विभागाचा स्वतंत्र कारभार आहे. अशा परिस्थितीत साईबाबा संस्थानचा कारभारावर देखरेख करायची ही तारेवरची कसरत करताना त्यांचे साईबाबा संस्थानच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे .
साईबाबांची संस्थानची रुग्ण सेवा ही सुमारे सत्तर ,पंच्याहत्तर वर्षापासूनची आहे .साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयात सुमारे पाच लाख रुग्ण उपचार घेतले आहे . व चाळीस वर्ष शिक्षण देण्याच काम सुरू आहे . या ठिकाणी भविकांचा ओघ वाढला , दान वाढलं . यावर आकर्षित होवून राज्य सरकारने संस्थान साठी स्वतंत्र कायदा केला. यातून राजकारण्यांची इथे कारभारी म्हणून नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला. या मंडळीनी स्वत :च्या मर्जीने केलेली नोकर भरती ही आज डोकेदुखी ठरत आहे. याशिवाय ही विश्वस्त मंडळे वादाग्रस्त ठरली. व न्यायालयाला एक देखरेख समिति नेमावी लागली.
साईबाबा संस्थान हे जगभरातील भाविकांचे लक्ष असलेले धार्मिक स्थळ आहे. शिर्डीतल्या साई समाधीवर नतमस्तक होण्यासाठी जगभरातील सुमारे अडीच तीन कोटी भाविक वर्षाकाठी याठिकाणी येतात. या सर्वभाविकांत धनिक भाविकांची संख्या ही प्रचंड आहे. यांच्या सह ,सामान्य भाविकही साई चरणी दान करण्यास मागे नाही. परिणामी साईबाबाकडे आज मितीला सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. पाच सहा हजार किलो चांदी आहे .चार पाचशे किलो सोने आहे.
“ सुमारे ” हा शब्द लिहिण्यामागे एक महत्वाचे कारण आहे. इथली व्यवस्था ही प्रसार माध्यमांपासून माहिती लपविण्याचा इरादाद्याने पत्रकारांनी माहिती मागितली तर वेळेवर न देण्यात धन्यता मानणारी आहे. उदा . आरोग्य सेवेची माहिती मागितली तर तिथल्या प्रमुखाला विचारा असे उत्तर मिळते ,तिथला प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याला विचारावं लागेल असे उत्तर मिळते . इथे प्रत्येकाला पद हवं आहे . त्या पदाची जबाबदारी नको.
त्यात त्रिसदस्य समितीचा कारभार म्हटलं कि , न्यायालयाची भीती दाखवून पळवाट शोधणारे सर्व अधिकारी यांनी संस्थानातील पारदर्शकताच संपुष्टात आणली आहे. आपल्या सोयीने निर्णय घेताना या महसुली अधिकाऱ्यांना न्यायालयाची भीती वाटत नाही. ही साधी बाब या समितीच्या लक्षात येत नाही का ,हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
संस्थानच्या प्रकल्पात आरोग्य व शिक्षण यांचा जरी विचार केला तरी इथल्या कारभाराची अनुभूती येते. या दोन्ही कडे साईबाबा संस्थान त्रिसदस्य समितीच लक्ष नाहीय असे म्हटले तर वावगे होणार नाही.
शैक्षणिक संकुलावर दृष्टी टाकू या
साईबाबा संस्थानाच्या समाज उपयोगी प्रकल्पात शैक्षणिक विभाग कार्यरत आहे . या प्रकल्पासाठी दानाचा उपयोग करता यावा म्हणून एक स्वतंत्र शीर्षक आहे. त्यात शिक्षणाचे महत्व कळणारे भाविक करोडोंंचे दान अर्पण करतात.अलीकडे साईबाबा संस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या शैक्षणिक संकुलात तंत्र शिक्षण , कन्या विद्यालय , जुनियर कॉलेज , सिनियर कॉलेज , संगणक महाविद्यालय या सर्वाना मिळून शैक्षणिक वर्ष २२-२३ मध्ये एकूण सहा हजार त्रेसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात तंत्र शिक्षण ,इंग्रजी माध्यमाचे व संगणक महाविद्यालयाचे विद्यार्थी हे शैक्षणिक शुल्क भरून शिक्षण घेत आहे. तर कन्या विद्यालयाच्या मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. याच आर्थिक वर्षात या शीर्षकाची भाविकांनी सुमारे १७ कोटी रुपये दान दिले आहे. तर साईबाबा संस्थानाने या शीर्षकात १९ .४५ कोटी खर्च केल्याचे सार्वजनिक केले आहे.
या उद्देशाने साईबाबा शिक्षण संकुल सुरू केले आहे. तो सफल होताना दिसत नाही . विशेष म्हणजे साईबाबा संस्थानच्या महाविद्यालयासोबत खाजगी महाविद्यालयाला देखील सरकारने परवानगी दिली होती. हा प्रकार चौकशीस पात्र आहे. यासोबतच इथेही स्थानिक राजकारणी नेहमी हस्तक्षेप करत असतात. तसेच यांच्या कार्यकर्त्यांची मुले या साईबाबा शिक्षण संकुलात शिक्षण घेतात. त्यांना ही मंडळी आपल्या खाजगी शिक्षण संकुलात प्रवेश देत नाही.याचा परिणाम होतकरू , हुशार मुलांवर होतो.

या विभागाकडे त्रिसदस्य समितीचे लक्ष असते तर सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अशा संस्थेसाठी अवघे पाच हजार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल बांधले आहे हि बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली असती. या गलथान कारभाराची चौकशी झाली असती. विशेष म्हणजे हे संकुल बांधून तयार आहे. आता ते जुने झाले आहे. तरीही राजकारणाची पोळी भाजण्याच्या कारस्थानात अप्रत्यक्ष साथ देत या समितीने हे सुमारे दोनशे कोटीची इमारत आजमितीला धुळखात पडून आहे . वास्तविक पाहता हे साईबाबा शिक्षण संकुल के जी टू पी जी या संकल्पनेतून शैक्षणिक विभागाचा विकास करत असताना दर वर्षी वाढणाऱ्या विद्यार्थी संख्येचा वेध घेण्यात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी व समिती हे कमी पडले आहे. याला कारणीभूत राजकीय हस्तक्षेप व अकुशल प्रशासकीय व्यवस्था या जबाबदार आहे . साईबाबा संस्थांचं स्वतंत्र विद्यापीठ, मेडिकल रिसर्च सेंटर किंवा कॉलेज असावं यासाठी एक प्रस्ताव दिलेला होता. या संकल्पनेचा फायदा दाक्षिणात्य साई भक्ताने घेतला. त्याने साईबाबांच्या नावाने विद्यापीठ स्थापन केले . या गोष्टीला संस्थान प्रशासन व समिती उघड्या डोळ्याने बघ्याची भूमिका घेऊन स्थानिंक राजकारण्यांची मर्जी सांभाळण्यात धन्यता मनात आहे.
साईबाबांच्या आरोग्य सेवेवर दृष्टी टाकू या
साईबाबा संस्थान देणगी कक्षात साईबाबा संस्थान उपक्रमांची शीर्षक यादी पाहून संस्थान चांगले व समाज उपयोगी काम करत आहे हे मानून भाविक भरभरून दान देतात. याचाच एक भाग म्हणजे साईबाबां संस्थांनच्या वैद्यकीय सेवेचे काम नजरेत भरणारे होते. पण ते सुरळीत चालू नये म्हणून छोट्या मोठ्या राजकीय लोकांचा नेहमीच या सेवेत हस्तक्षेप सुरु असतो . परिणामी शिफारस चिठ्ठयावर नोकरी मिळवलेल्या वरदहस्त प्राप्त कर्मचारी हे रुग्णांसह इथल्या शिस्तप्रिय कर्मचाऱ्यांना उर्मट वागणूक देण्यात कधीही मागे राहत नाही. अनेकदा इथे मोफत दिली जाणारी आरोग्य सेवा यावर फक्त आपला अधिकार ,हक्क आहे.असा अविर्भाव वरचेवर अनुभवाला येतो. विशेष म्हणजे साईनाथ हॉस्पिटल मध्ये मराठवाडा ,विदर्भासह राज्य भरातील गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. व साईबाबा हॉस्पिटल अगदी बस स्थानक व मुख्य रस्त्यावर दर्शनी भागात आहे. त्यामुळे गोर गरीब , गरजू सर्व प्रथम इथे जातात. आणि विनाकारण वेगवेगळ्या तपासण्या करण्याच्या चक्रव्ह्यूवात अडकतात. सहा महिन्यांपासून साईबाबा हॉस्पिटलचे एक्सरे मशीन बंद पडलेले आहे. सोनोग्राफी सेवा बंद आहे. चेस्ट एक्स्पर्ट नसल्याने भाविकाने दान दिलेले महागडे यंत्र धुळखात पडून आहे. खंडपीठाने साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयाच्या साहित्य खरेदीसाठी चौरेचाळीस कोटी रुपयांची गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये मान्यता दिली होती.त्याची खरेदी अद्यापही रखडलेली आहे.
या ठिकाणी एक चांगले फ्रंट ऑफिस असणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी इथे येणारे रुग्णाला त्याच्या आजारानुसार ,त्याच्या आर्थिक कुवती नुसार साईनाथ हॉस्पिटल कि साईबाबा हॉस्पिटल त्याच्या उपचारसासाठी योग्य आहे का याच मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने इथला शंभर ,एकशे दहा रुपयाचा केस पेपर काढून त्याला आपल्या कुवतीप्रमाणे साईबाबा कि साईनाथ हे ठरवावे लागते.
अलीकडे घडलेला प्रकार हा दुर्लक्ष करण्याजोग नाही
अलीकडे साईबाबा संस्थांनच्या आरोग्य सेवेत प्रचंड विस्कळीत पणा आला आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलणे हा संस्थान कर्मचाऱ्यांना लागलेला रोग आहे . खास करून पर्मनंट होऊन विभाग प्रमुख झालेले या रोगाने पछाडलेले आहेत. काल परवा साईनाथ हॉस्पिटल मध्ये विराज काळे या लहानग्याला एका इंजेक्शनच कॉम्प्लिकेशन झालं. यातून त्याच्या सायटिका नर्व्हला इजा झाली आहे. व या नर्व्ह चे कार्य पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी या मुलाला फिजिओथेरपी दिली जाणे. हा प्रमुख उपचार आहे. याने पायाची दुखापत हि पाच सहा महिन्यात पूर्ण पणे बरी होवू शकते. अस मत व्यक्त केलं जात आहे . या प्रकरणात उशिराने तत्परता दाखविण्यात व्यवस्थापकीय संचालक डॉ शैलेश ओक याना यश न मिळाल्याने विराजला त्याच्या पालकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

साईनाथ हॉस्पिटल एक वरदान
साईबाबा संस्थानच साईनाथ हॉस्पिटल हे परीसारतीलच नव्हे तर राज्यातील गोरगरीब रुग्णासाठी वरदान आहे. पण दुर्दैवाने इथे काही कायम डॉक्टर हे ते देत आरोग्यसेवा वेठीस धरत आहे.रुग्ण राज्यभरातून येतात पण हे डॉक्टर अचानक सुट्टी घेतात. परिणामी रुग्ण परत जातो. याचाच एक भाग म्हणून इथे सेवा देणारे व्हिजीटींग डॉक्टरांना त्यांनी ज्यास्त काम करू नये की जेणे करून यांच्या कामाची तुलना होईल याची दक्षता घेण्यासाठी असे डॉक्टर येणार नाही किंवा येऊ नये म्हणून काळजी घेतात. या डॉक्टरांकडे रुग्ण जाण्यास तयार नाही . ते व्हिजिटिंग डॉक्टर कडे जाण्यासाठी येतात. अशा परगावच्या रुग्णाला या कायम डॉक्टरांचे केसपेपर देण्याची सक्ती केली जाते. वास्तविक पाहता हि कृती रुग्णाच्या अधिकारावर गदा आणणारी आहे . ज्या साईबाबा रुग्णालयात वर्षकाठी लाखों रुग्ण उपचार घेतात. याचा नावाचा बोर्ड देखील साईबाबा संस्थान प्रशासन लावू शकत नाही. यावरून त्यांची मानसिकता ही साईनाथ रुग्णालयाची आरोग्य सेवा नावारूपाला यावी याच्या विपरीत आहे. अलीकडे याच परिसरात सुरू केलेले अग्निशमन केंद्र याचा मोठा फलक लावून प्रशासनाने आपली विद्वत्ता व साईबाबा प्रती आपली आस्था जपली आहे.

आजमितीला साईनाथ हॉस्पिटल मधील नाक कान घसा व नेत्र विभाग हा वेठीस धरलेला आहे. या विभागाचे प्रमुखांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. त्यामुळे खंडपीठाने नेमलेली समिती देखील यांच्यापुढे हतबल असल्याचे दिसून येते.