महात्मा फुले कृषि विद्यापीठात गेल्या काही वर्षात रब्बी पिकांच्या पाणी व्यवस्थापनासंबंधी झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन, मुबलक पाणी उपलब्ध असल्यास भुईमूग-ज्वारी-सूर्यफूल, मध्यम पाणी उपलब्ध असल्यास भुईमूग-ज्वारी-करडई किंवा बाजरी-हरभरा, कमी पाणी उपलब्ध असल्यास बाजरी-हरभरा किंवा भुईमूग-करडई तसेच अत्यंत कमी पाणी उपलब्ध असल्यास बाजरी-हरभरा अशा प्रकारे पीक पद्धतीची निवड करावी.
बाष्पीभवनावर आधारित पिकांना पाणी देण्याचे अंतर, खरीप हंगामात १३ ते १५ दिवसांनी, रब्बी हंगामात १८ ते २० दिवसांनी व उन्हाळी हंगामात ८ ते १० दिवसाच्या अंतराने निश्चित करण्यात आले आहे.
पाऊसमान व जमिनीचा प्रकार यानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो.
उसासाठी पाण्याची गरज जास्त असल्याने व हे पीक शेतात कमीत कमी वर्षभर राहत असल्याने पर्यायी पीक म्हणून तूर (आयसीपीएल-८७) व तिचे दोन खोडवे पाण्याच्या बचतीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर दिसून आले. ऊस पिकासाठी २५० ते ३०० सें.मी. पाणी देऊन हेक्टरी सरासरी १०० ते १२० टन उत्पादन मिळते. या ऐवजी तुरीचे दोन्ही खोडव्यासह एकूण ९० सें.मी. पाणी देऊन हेक्टरी ४३ क्विंटल उत्पादन मिळते.
गहू पिकापासून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत म्हणजे मुकुटमुळे फुटणे, फुटवे फुटणे, फुलोरा तसे दाणे चिकात असताना अशा एकूण चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
भारी काळया जमिनीत मोहरी (वाण सीता) पिकास ७५ मि.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर पाणी दिल्यास पीक उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
हरभरा पिकास पेरणीपूर्वी एक पाणी व पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांनुसार दोन पाणी, पहिले पिकास फांद्या फुटण्याच्या अवस्थेत व दुसरे दाणे भरण्याची अवस्थेत दिल्यास अधिक उत्पादन मिळाल्याचे दिसून आले आहे.
७५ मि.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर कलिंगडास, ५० मि.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर वांग्यास व ३० मि.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर कांदा पिकास पाणी दिल्यास या पिकांपासून चांगले उत्पादन मिळते.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .