“ उन्हाळी पिकांवरील संशोधनाचे निष्कर्ष”
प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर करून पीक उत्पादनवाढीच्या दृष्टीने पाणी देण्याच्या विविध पद्धती अभ्यासण्यात आल्या. त्यात पिकास ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे, बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेऊन पाणी देणे व पिकाच्या पाण्याच्या दृष्टीने संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे यांचा समावेश केला गेल.
उन्हाळी हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत ५ ते ६ सेंटीमीटर, मध्यम जमिनीत ६ ते ८ सेंटीमीटर व भारी जमिनीत ७ ते १० सेंटीमीटर उंचीचे पाणी अनुक्रमे ६ ते ८, ८ ते १० व १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे अशी सर्वसाधारण शिफारस आहे.
१. उन्हाळी सूर्यफूल पिकासाठी ७५ मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे ६ ते ७ दिवसांनी पाणी दिल्याने अधिक उत्पादन मिळते.
२. उन्हाळी हंगामात भुईमूग पिकास ७५ मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर व १० दिवसाच्या अंतराने पाणी दिले असता ७५ मिलिमीटर बाष्पीभवनानंतर सुमारे ६ ते ७ दिवसांनी दिलेल्या पाण्यामुळे अधिक उत्पादन मिळून पाण्याची कार्यक्षमता ही वाढल्याचे दिसून आली.
३. उन्हाळी हंगामात कलिंगडासही ७५ मिलिमीटर बाष्पीभवन झाल्यानंतर पाणी देणे अधिक उत्पादनासाठी फायद्याचे दिसून आले.
४. रुंद गादीवाफा व सारा पद्धतीवर घेतलेल्या कांदा पिकाचे रुंद गादीवाफा पद्धतीवर अधिक उत्पादन मिळून पाण्याची कार्यक्षमताही जास्त मिळते.
५. उन्हाळी पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब केल्याने पाण्याची बचत, उत्पादनात वाढ तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले आहे.
६. उन्हाळी भुईमुगासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने पाण्यात ४० टक्के व उत्पादनात २४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
७. कोबी पिकाची बायवॅाल ठिबक पद्धतीवर लागवड केल्याने प्रचलित पद्धतीच्या तुलनेत पाण्याच्या मात्रेत ६६ टक्के बचत झाली तसेच उत्पादनात ६६ टक्के वाढ झाली.
८. वांगी पिकासाठी शिफारस केलेली नत्राची मात्रा ठिबक सिंचनातून दिल्याने पाण्याची ५२ टक्के बचत होऊन उत्पादनात २९ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
९. उसाची जोडओळ पद्धतीत लागवड करून खताची मात्रा द्रवरुपातून ठिबकमधून दिल्याने प्रचलित लागवड व पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत पाण्यात ५६ टक्के
बचत, उत्पादनात १८ टक्के वाढ तसेच खताच्या मात्रेत २५ टक्के बचत झाल्याचे आढळून आले.
१०. उन्हाळी मिरचीसाठी ठिबकचा वापर केल्याने पाण्यात ५६ टक्के बचत व उत्पादनात ४५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
११. केळीची लागवड जोडओळ पद्धतीत करून ठिबक सिंचनाने केळीस पाणी दिल्याने पाण्यात ५० टक्के बचत व उत्पादनात २९ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
१२. तुषार सिंचन पद्धतीवर घेतलेल्या उन्हाळी भुईमुगाच्या उत्पादनात प्रचलित पद्धतीच्या तुलनेत २१ टक्के वाढ व पाण्यात ३५ टक्के बचत झाली.
१३. उन्हाळी कांद्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्याने प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत पाण्यात ३३ टक्के बचत होऊन कांद्याच्या उत्पादनात २३ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत .