साईबाबा संस्थान शिर्डी,दाक्षिणात्य समितीचा द्रविडी प्राणायाम
साईबाबा संस्थानाच्या त्रिसदस्य समितीने देशभरात साई मंदिराची प्रतिकृती उभारणे व शिर्डीत सुरु असलेल्या आरोग्य , अन्नदान सेवा पुरविण्याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सुलभता यावी म्हणून संस्थानाने देशभरातील भाविकांची व देशभरातील साई मंदिर व्यवस्थापनाची मते मागविली आहे .त्रिसदस्य समितीच्या या निर्णयाने मराठवाड्यातील पाथरी ,धूपखेडा या ठिकाणच्या साई मंदिरांच्या विकासाचा मार्ग खुला होणार आहे. पाथरीच्या साई मंदिराचा विकास आराखडा जाहीर होताच शिर्डीकरांनी तीव्र विरोध नोंदविला होता. आता हा निर्णय साईबाबा संस्थानने घेतल्याने या विवादावर पडदा पडणार आहे.
आज मितीला साईबाबा संस्थानचा कारभार हा मा खंडपीठाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्य समिती म्हणजेच अहमदनगर प्रधान न्यायाधीश येरलागड्डा ,जिल्हाधिकारी सालीमठ तसेच साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाशंकर या समितीकडे आहे. हे तिघे दाक्षिणात्य असल्याने आपसात चांगला समन्वय पाहायला मिळत आहे.प्रसंगी कार्यालयीन गोपनीयता पाळता यावी म्हणून त्यांच्या प्रांतिक मातृभाषेत आपसात चर्चा करून निर्णय घेतले जात असल्याची कुजबुज सुरु आहे. परिणामी मंत्री ,संत्री व त्यांचे कार्यकर्ते अशा अतिविशिष्ट व्यक्ती वगळता सर्वाना मंदिर परिसराबाहेर चप्पल काढण्याची अनिवार्यता हा धाडसी निर्णय अंमलबजावणी सुरु आहे. या निर्णयाबाबद भाविकांना वाटप होत असलेला बुंदी प्रसाद पायात येतो म्हणून परिसरात चप्पल वापरता येणार नाही.असा तर्क दिला जात असेल तर त्याच प्रसाद लाडू विक्री केंद्रात आता चप्पल स्टॅन्ड केले याला कुठला तर्क आहे का ? या समिती कडे.
साईबाबा आता तुमच्या गावी येणार !
या समितीने देशभर शिर्डीसारखेच साई मंदिर उभारण्याचे दोन योजना आखल्या आहेत. त्या कार्यन्वित करण्याआधी या समितीने भाविकांच्या सूचना मागविल्या आहे.समितीला हा सल्ला देणाराने समितीला बदनाम करण्याचा प्रयोग केला आहे कि , आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा हे प्रश्न आज उभे ठाकले आहे. भक्त भावनिक असतात. साईबाबांच्या दारी येऊनही अनेकदा खोटे बोलतात. अशा भाविकांना संस्थांनचा हा निर्णय आवडला आहे. काहींची प्रतिक्रिया तर “मेरे घर के आगे, साईनाथ तेरा मंदिर बन जाये “ अशी आहे. हे भाविक उत्साही आहेत. तर काही भाविकांची आस्था मूळ स्थानावर आहे. त्यांना हे नको आहे .
कथित साई जन्मस्थळ पाथरी सह धूपखेडा या साई मंदिर विकासाचा मार्ग खुला .
तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने साईबाबांचे कथित जन्मस्थान “पाथरी “ येथील साई मंदिरासाठी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तो शिर्डीकरांच्या जिव्हारी लागला होता. त्याला विरोध करण्यासाठी शिर्डीकरांनी तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. तेव्हा आता साईबाबा संस्थानानेच देशभर शिर्डी सारखेच साई मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. या निर्णयाला शिर्डीकर हे विरोध करणारच आहेत.अर्थात देशभर आज मितीला शेकडो साई मंदिर आहेत. याचा विसर साईबाबा संस्थान समिती व ग्रामस्थांना पडलेला आहे. अर्थात शिर्डीचं संपूर्ण अर्थकारण हे “साईबाबांच्या “ अवती भोवती फिरणार आहे. त्यामुळेच तर इथले नगरसेवक हे वीस वीस लाख रुपये खर्चूनही निवडणुकीत पराभव पचवू शकतात. जर साईबाबा संस्थान व्यवस्थापन समिती आपल्या निर्णयावर ठाम राहीली तर पाथरी साई मंदिरासह साईंच्या सर्व पाऊलखुणांचा विकास होईल हे नक्की. त्याच सोबत साईबाबा संस्थान शिर्डी येथे सुरु असलेल्या आरोग्य ,शिक्षण , भोजन प्रसाद यासर्वांचा लाभ देशभरातील साई मंदिराच्या मार्फत गरजूपर्यंत पोहचेल याकडे दुर्लक्ष करून चालणार या नाही.
निर्णय चांगला असेल ,पण त्याआधी साईंच्या तिजोरीच वास्तव काय आहे ?
साईबाबा संस्थांनच्या पाच वर्षांचा आर्थिक आलेख पहिला तर कोरोना नंतर भाविकांच्या दानाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात खाली आली आहे.हे साईबाबा संस्थानच्या सन २०२१ -२२ च्या वार्षिक अहवालाने उघड झाले आहे. त्यानुसार कोरोना पूर्वी साईबाबा संस्थानच्या वार्षिक आर्थिक जमेची ठेवीवरील व्याजासहची रक्कम सुमारे सहाशे कोटी होती. ती २१-२२ मध्ये अवघी ४३९ कोटी आहे. हि बाब चिंताजनक आहे. कारण यात व्याजाचीच रक्कम दीडशे ते दोनशे कोटी आहे. व वार्षिक खर्च सुमारे ३२५ कोटीच्या घरात आहे. याचाच अर्थ साईबाबा संस्थानांचा खर्च हा गरजेपेक्षा ज्यास्त आहे. जो निम्म्यावर कसा आणता येईल यासाठी आधी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी कर्मचारी कपातीसह विनाकारण शासकीय निम शासकीय वेतन पद्धती अवलंबून वाढलेल्या खर्चाकडे केलेलं दुर्लक्ष याबाबत या न्यायालयाच्या समितीने प्राधान्य क्रमाने कठोर निर्णय घेत अमलात आणणे गरजेचे आहे. हि आर्थिक स्थिती पाहता देशभर किती व कसे साई मंदिर उभारणार ? याचे उत्तर धोरण ठरविण्याआधी शोधणे गरजेचे आहे. अर्थात अगदी नियोजनबद्ध व सातत्याने मंदिर उभारणी केली तर देशभर शिर्डी सारखी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होऊ शकतात.जे शिर्डीत येऊ शकत नाही, ज्यांना साईबाबा माहित नाही अशा भाविकांपर्यंत साईबाबा व त्याचा आशीर्वाद पोहचेल हे नक्की.